मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला ! काँग्रेसला सर्वाधिक ८ जागा, ठाकरे गट, शरद पवार गटाला फक्त 'इतक्याच' जागा...
राज्यात आता विधान परिषद निवडणुकांचं बिगुल वाजायला सुरुवात झाली आहे. विधान परिषदेच्या जागावाटपावरून महायुतीमध्ये तिढा दिसत असला तरी महाविकास आघाडीमध्ये मात्र जागावाटप फायनल झाल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांमध्ये एक बैठक पार सापडली असून त्यात जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याचे समजते आहे. विधानपरिषदेच्या एकूण सतरा जागांवर महाविकास आघाडीचे एकमत झाले असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी हि माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या जागावाटपात काँग्रेसला आठ जागा, शिवसेना ठाकरे गटाला सहा जागा तर राष्ट्र्वादी काँग्रेस शरद पवार गटाला तीन जागा मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
काँग्रेस – ८ जागा
चंद्रपूर
यवतमाळ
भंडारा
अमरावती
अहिल्यानगर
सोलापूर
धाराशिव
नागपूर (पोटनिवडणूक)
शिवसेना ठाकरे गट – ६ जागा
रायगड
जळगाव
परभणी – हिंगोली
छत्रपती संभाजीनगर
नांदेड
नाशिक
राष्ट्रवादी शरद पवार गट – ३ जागा
पुणे
ठाणे
सांगली – सातारा
विधान परिषद निवडणुकीसंदर्भात अधिसूचना २५ मे रोजी जाहीर करण्यात आली असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख १ जून असेल. अर्जाची छाननी २ जून रोजी करण्यात येणार आहे. तर, अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख ४ जून असेल. विधान परिषद निवडणुकीचे मतदान १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत होणार असून मतमोजणी २२ जून रोजी पार पडणार आहे.
‘मनोज जरांगेंना आरक्षण अन् लोकशाहीचं शून्य ज्ञान’; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “भाजप लोकशाही मानत नाही, त्यांनी निवडणुकीत घोडेबाजार मांडला आहे, ‘पैसा फेक तमाशा देख’चा दुसरा अंक सुरु झाला असून, ५ लाख रुपये आगाऊ देऊन नगरसेवकांची पळवापळवी केली जात आहे, अशा परिस्थितीत लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी महाविकास आघाडी एकजूटपणे विधान परिषदेची निवडणूक लढवणार आहे. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून कोणताही विसंवाद अथवा तिढा नाही तर सुसंवाद आहे, तर दुसरीकडे ‘गँग्ज ऑफ ट्रिपल इंजिन’ सरकारमध्येच जागा वाटपावरून धुसफूस सुरु आहे,” असेही सपकाळ म्हणाले.






