शिर्डीतील जगप्रसिद्ध साईबाबा संस्थानच्या नावाचा वापर करून भाविकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. बनावट वेबसाईट तयार
करून भक्तनिवास आणि दर्शनाचे ऑनलाईन बुकिंग दिले जात होते. या प्रकरणी साईबाबा संस्थानाने तात्काळ दखल घेत शिर्डी पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. सध्या पोलीस सायबर तज्ञांच्या मदतीने या रॅकेटचा शोध घेत आहेत.
हे प्रकरण कसे आले उजळात?
कर्नाटक येथील साईभक्त राम जाधव हे आपल्या नातवाच्या वाढदिवसानिमित्त कुटुंबासह शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते. त्यांनी एका वेबसाईटवरून साईबाबा संस्थांच्या भक्तनिवासात ऑनलाईन रूम बुक केली होती. ते जेव्हा शिर्डीतील भक्तनिवासात पोहोचले तेव्हा त्यांना त्यांच्या नावाने कोणतेही बुकिंग नसल्याचे समजले. यानंतर त्यांनी साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. यानंतर त्यांना आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
ही घटना समोर येताच साईबाबा संस्थानाने पोलीस ठाणे गाठले. साई संस्थांचा नावाचा गैरवापर करून भाविकांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भरती यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सायबर पोलिसांची मदत घेतली जात आहे. यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून पोलीस तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास करत आहेत. साई संस्थान आणि पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे साईभक्तांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी केले आवाहन
अश्या प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी पोलिसांनी महत्वाचे आवाहन केले आहे. संस्थानच्या अधिकृत वेबसाईट (https://sai.org.in/) वरूनच सर्व प्रकारच्या सेवांचे ऑनलाइन बुकिंग करावे, असे पोलिसांनी म्हटले आहे. कोणत्याही संशयास्पद किंवा अनधिकृत वेबसाईटवर विश्वास ठेवू नये आणि आपली आर्थिक माहिती देऊ नये असे आवाहनही करण्यात आले आहे.
‘आमच्याविरोधातील केस मागे घे, नाहीतर तुला…’; महिलेसह तिच्या मुलाला दिली जीवे मारण्याची धमकी