संग्रहित फोटो
पुणे : राज्यात फसवणूकीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून फसवणुकीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शेअर बाजारात गुंतवणुक तसेच ऑनलाइन टास्कच्या आमिषाने तिघांची सायबर चोरट्यांनी ८३ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वानवडी पोलिसांत ६७ वर्षीय ज्येष्ठ महिलेने तक्रार दिली आहे. सायबर चोरट्यांनी महिलेला शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला नफा देण्याच्या आमिषाने २८ लाखाला गंडा घातला आहे. नोव्हेंबर २०२४ ते फेब्रवारी २०२५ कालावधीत ही फसवणूक झाली आहे. चोरट्यांनी त्यांना गुंतवणूकीवर चांगला परतावा मिळेल, असे सांगितले. नंतर महिलेला एका बँक खात्यात पैसे भरण्यास भाग पाडले. पैसे भरल्यानंतर परतावा म्हणून त्यांना काही रक्कम देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. महिलेने या विश्वासाने ३ महिन्यात वेळोवेळी २८ लाख २० हजार रुपये जमा केले. रक्कम भरतानाच महिलेने संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यांना परतावा देण्याची मागणी केली. तेव्हा चोरट्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावेळी महिलेला फसवणूक होत असल्याचे लक्षात आले.
बिबवेवाडीतील नागरिकालाही गंडा
बिबवेवाडी परिसरातील एका नागरिकाची देखील सायबर चोरट्यांनी अशाच पद्धतीने शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने २५ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत बिबवेवाडी पोलिसांत ५४ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे तपास करत आहेत.
कोथरुडमधील व्यक्तीला ३० लाखाला गंडा
कोथरूड भागातील एका नोकरदार व्यक्तीला सायबर चोरट्यांनी टास्क तसेच युट्यूबला लाईक्स मिळवून देण्यासाठी तसेच ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी (ऑनलाइन टास्क) असल्याच्या आमिषाने २९ लाख ६३ हजार रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत ५३ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने तपास करत आहेत.