संग्रहित फोटो
पुणे : राज्यात फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून भागातून फसवणुकीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता एक मोठी बातमी समोर आली आहे. ऑनलाइन पद्धतीने घरातून कामाची संधी आहे असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी तरुणाची साडेपाच लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्याविरुद्ध चंदननगर पोलिसांनी गु्न्हा दाखल केला आहे. याबाबत एका तरुणाने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तक्रारदार तरुण चंदननगर भागात राहायला आहे. चोरट्याने तरुणाच्या मोबाइलवर संदेश पाठविला होता. घरातून ऑनलाइन पद्धतीने काम केल्यास (ऑनलाइन टास्क) चांगले पेैसे मिळतील, असे आमिष चोरट्याने त्याला दाखविले होते. सुरुवातीला चोरट्याने त्याला ऑनलाइन पद्धतीने एक काम दिले. हे काम पूर्ण केल्यानंतर तरुणाला पैसे दिले. ऑनलाइन पद्धतीने काम केल्यास चांगले पैसे मिळतील, असे आमिष दाखवून चोरट्यांनी तरुणाला पैसे गुंतविण्यास सांगितले. तरुणाने चोरट्याच्या खात्यात वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने पाच लाख ३३ हजार रुपये जमा केले. त्यानंतर चोरट्याने त्याचा मोबाइल क्रमांक बंद केला. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर तरुणाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे अधिक तपास करत आहेत.
निधी देण्याचे आमिष दाखवून सरपंचाची फसवणूक
गेल्या काही दिवसाखाली शिरुर तालुक्यातील एक सरपंच तसेच एका सामाजिक कार्यकर्त्याला एका बंटी बबलीने आम्ही स्वच्छ भारत अभियान विभागात कामाला असून, आमदार खासदारांसोबत ओळख असल्याचे दाखवून गावच्या विकास कामांना निधी देण्याचे आमिष दाखवत तब्बल सत्तावीस लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिरुर पोलीस येथे येथे सुदर्शन म्हाळू उगले व सारिका सुदर्शन उगले या बंटी बबलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे सुद्धा वाचा : रात्री वाहतूक व्यवस्थापक घरी, प्रवासी स्थानकात अन् बस…; सासवडमधील प्रकार उघडकीस
कोथरुडमधील व्यक्तीला ३० लाखाला गंडा
कोथरूड भागातील एका नोकरदार व्यक्तीला सायबर चोरट्यांनी टास्क तसेच युट्यूबला लाईक्स मिळवून देण्यासाठी तसेच ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी (ऑनलाइन टास्क) असल्याच्या आमिषाने २९ लाख ६३ हजार रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत ५३ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने तपास करत आहेत.