पश्चिम बंगाल हादरले! मैत्रिणीसोबत जेवायला गेली अन्...; (Photo Credit- X)
West Bengal: पश्चिम बंगालमधील बर्धमान जिल्ह्यातील दुर्गापूर येथे एका मेडिकल कॉलेजच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्काराची (Gangrape) संतापजनक घटना समोर आली आहे. पीडित तरुणी ओडिशाच्या जलेश्वरची रहिवासी आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी रात्री ८ ते ८.३० दरम्यान घडली. ही विद्यार्थिनी तिच्या एका मैत्रिणीसोबत रात्रीचे जेवण करण्यासाठी कॉलेज परिसरातून बाहेर गेली होती. यावेळी तीन तरुण त्यांच्याजवळ आले. आरोपींना पाहून पीडितेची मैत्रीण घाबरली आणि घटनास्थळावरून पळून गेली. या तिन्ही आरोपींनी पीडितेचा मोबाईल फोन हिसकावून घेतला आणि तिला जबरदस्तीने जवळच्या जंगलात नेले, जिथे त्यांनी तिला आपल्या वासनेला बळी पाडले. या क्रूर कृत्यानंतर आरोपींनी पीडितेला कोणाला सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली. इतकेच नाही, तर मोबाईल परत हवा असल्यास पैसे देण्याची धमकीही त्यांनी दिली.
Durgapur, West Bengal | The victim’s father says, “At 10 PM, her friend called us and said that your daughter has been raped. We live in Jaleshwar. My daughter was studying here. Yesterday, one of her classmates took her out on the pretext of getting something to eat, but when… https://t.co/Rf1Z3KOXaA pic.twitter.com/6dcDP0Dviu — ANI (@ANI) October 11, 2025
या घटनेनंतर पीडितेची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. तिच्यावर दुर्गापूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच शनिवारी सकाळी पीडितेचे पालक ओडिशाहून दुर्गापूरला पोहोचले. पीडितेच्या वडिलांनी तीव्र संताप व्यक्त करत, “या कॉलेजच्या सुरक्षिततेबद्दल ऐकून मुलीला इथे पाठवले होते, पण आता जे घडले त्यामुळे आम्हाला खूप त्रास झाला आहे. या गुन्ह्यातील दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे,” अशी मागणी केली. पीडितेच्या आईनेही पोलिसांकडून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवून घेतला असून, प्राथमिक तपासात अनेक महत्त्वाचे पुरावे समोर आले आहेत. तपास अधिकाऱ्यांच्या मते, हल्लेखोरांनी या गुन्ह्याची योजना आधीच आखली होती. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पीडितेच्या मैत्रिणीचीही चौकशी केली जात आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, फॉरेन्सिक टीमनेही घटनास्थळी पुरावे गोळा केले आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाचे (NCW) एक पथक पीडिता आणि तिच्या कुटुंबाला भेटण्यासाठी रवाना झाले आहे.
NCW सदस्या अर्चना मजुमदार यांनी पश्चिम बंगालमधील महिलांवरील वाढत्या गुन्ह्यांवर चिंता व्यक्त केली आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस पाऊले उचलण्याचे आवाहन केले. दरम्यान, पश्चिम बंगालच्या आरोग्य विभागानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, खाजगी वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे. या घटनेमुळे राज्यात महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.