संग्रहित फोटो
शिक्रापूर : सणसवाडी (ता. शिरुर) येथील हॉटेल भाऊचा धक्का जवळ रात्रीच्या सुमारास उभ्या असलेल्या तरुणीला चाकूचा धाक दाखवून मोबाईल हिसकावून चोरी करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले आहे. गणेश कैलास भोसले व अजय माणिक घेगडे असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहेत. दरम्यान, आरोपींना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी ही खराडी पोलीस स्टेशन हद्दीतून चोरी केल्याचे समोर आले. आरोपी चोरीसाठी चोरीच्या दुचाकीचा वापर करत असल्याचे उघड झाले आहे.
सणसवाडी (ता. शिरुर) येथील हॉटेल भाऊचा धक्का जवळून पायल लोहार ही तरुणी रात्रीच्या सुमारास तिच्या वडिलांना डबा देण्यासाठी चाललेली असताना दुचाकीहून आलेल्या तिन जणांनी पायलला चाकूचा धाक दाखवून तिच्या हातातील मोबाईल हिसकावून पळून गेले. याबाबत पायल संतोष लोहार (वय १९ रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. पाडळोशी ता. पाटण जि. सातारा) हिने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी तीन आरोपींवर गुन्हा दाखल केला होता.
गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त
गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंदा तालुक्यातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस हवालदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजय जाधव, राजू मोमीन, मंगेश थिगळे, सागर धुमाळ यांनी श्रीगोंदा येथे जात गणेश भोसलेला ताब्यात घेतले. त्याने अजय घेगडे व त्यांच्या एका साथीदाराच्या मदतीने गुन्हा केल्याचे कबुल केले. त्यावेळी पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली. तसेच गणेश कैलास भोसले (वय १८ रा. मावळेवाडी ता. पारनेर जि. अहमदनगर) व अजय माणिक घेगडे (वय १९ वर्षे रा. राजापूर ता. श्रीगोंदा जि, अहमदनगर) या दोघांना अटक केली. तर त्यांचा एक साथीदार फरार झाल्याने त्याचा शोध पोलीस घेत असून, पुढील तपास पोलीस हवालदार रवीकिरण जाधव हे करत आहेत.
पुण्यात पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह?
पुण्यातही सहा वर्षांपुर्वी सोनसाखळी चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. दिवसाला तीन ते चार सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असत. पादचारी महिला तसेच ज्येष्ठ महिला या चोरट्यांच्या टार्गेटवर असत. तीन राज्यात या टोळ्यांनी मोठा गोंधळ घातला होता. पुणे पोलिसांनी तीन राज्यातील माहिती एकत्रित करून या चोरट्यांचा माग सुरू केला होता. नंतर यातील काही टोळ्यांना पकडण्यात यश देखील आले होते. त्यांच्यावर मोक्कासारखी कारवाई देखील केली होती. नंतर या घटना थांबल्या होत्या. परंतु, आता पुन्हा सहा वर्षांनी सोन साखळी टोळ्या ॲक्टीव्ह झाल्याचे गेल्या काही महिन्यांपासून दिसत आहे. त्यामुळे पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह झाले आहेत का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.