मेट्रो स्थानकात आंदोलन करणाऱ्या नऊ जणांना पोलीस कोठडी
पुणे: मोफत शिक्षण, नोकऱ्यांसह विविध मागण्यांसाठी मेट्रोच्या रुळावर उतरून आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा निलंबित कार्यकर्ता नरेंद्र पावटेकर, त्याचे वडील ज्ञानेश्वर पावटेकर यांच्यासह नऊ जणांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तर उर्वरित आठ आरोपींच्या पोलिस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
विविध मागण्यांसाठी आंदोलनकर्त्यांनी रविवारी (ता. ९) दुपारी दोन तास पुणे महानगरपालिका मेट्रो स्थानकाच्या रुळावर उतरून आंदोलन केले. या वेळी आंदोलकांनी पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल यांच्यासह पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांशी वाद घालत धक्काबुक्की केली, तसेच त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकले. या झटापटीत शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्यासह पाच पोलिस कर्मचारी आणि एक महिला जखमी झाल्या. त्यानंतर सर्व आंदोलकांवर खुनाचा प्रयत्न, बेकायदा जमाव जमविणे, दंगल आणि मेट्रो रेल्वे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या आंदोलकांना सोमवारी (ता.१०) न्यायालयात हजर करण्यात आले होते.