प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार (File Photo : Crime)
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न केला जात आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहेत. असे असताना आता दत्तमंदिर रोड परिसरातील एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.
संशयिताने पीडितेला लॉजवर नेल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर हा प्रकार पोलिसांपर्यंत पोहोचला असून, उपनगर पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोलू उर्फ तुषार विजय गलोत (रा. संसरीनाका, देवळाली कॅम्प) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित नराधमाचे नाव आहे. पीडितेच्या आईने याप्रकरणी उपनगर पोलिसात तक्रार दिली आहे. पीडित मुलगी आणि संशयित यांची आधीपासून ओळख होती.
दरम्यान, संशयिताने तिला प्रेमाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. गेल्या मंगळवारी (दि. २) सायंकाळी संशयित गोलू याने पीडितेला मुक्तिधाम मंदिराच्या पाठीमागील नटराज हॉटेल या लॉजवर नेले होते. मुलगी घरी परतल्यानंतर तिच्या संशयास्पद हालचालींवरून कुटुंबीयांनी तिला जाब विचारला. यावेळी तिने घडलेला सर्व आपबिती सांगितल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला. त्यांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठून गुन्हा दाखल केला.
महिलांवरील बलात्काराची वाढत आहेत प्रकरणे
महिलांवरील बलात्काराची प्रकरणे वाढत असून, अलीकडे लहान मुलींचेही आयुष्य यात अडकत असल्याचे समोर येत आहे. मागील काही काळापासून नराधमांकडून चिमुकल्या लहान मुलींवरही लैंगिक अत्याचार केला जात आहे. आतापर्यंत अशी अनेक प्रकरणे समोर आली असून यात आणखी एका घटनेचा समावेश झाला आहे. ही घटना दिल्लीतील जनकपुरी येथे घडून आल्याची माहिती आहे. ३ वर्षीय चिमुकली पहिल्याच दिवशी शाळेत गेली असता शाळेतील कर्मचाऱ्याने तिच्यासोबत हे दुष्कृत्य केल्याचे समोर आले आहे.






