संग्रहित फोटो
परभणी : राज्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. ‘परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला पोलिस जबाबदार आहेत. त्यांना परभणी जिल्ह्यातील नवा मोंढा पोलिस ठाण्यात मारहाण करण्यात आली,’ असा ठपका न्यायदंडाधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडी मृत्यू प्रकरणाच्या चौकशीअंती ठेवला आहे. हा ४५१ पानी गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आयोगानेही गुरुवारी त्याची गंभीर दखल घेतली आहे. आयोगाने सर्व पोलिसांना नोटिसा बजावून त्यांच्याकडून उत्तर मागितले आहे.
सोमनाथ यांचा 15 डिसेंबर रोजी कोठडीत असताना तुरुंगात मृत्यू झाल्यापासून हे प्रकरण तापलेलं आहे. तर पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीतच हा मृत्यू झाला आहे. त्या संदर्भात सूर्यवंशींच्या शरीरावर अनेक जखमाही होत्या, असं शवविच्छेदन अहवालातून समोर आलंय. मात्र राज्य सरकारनं अद्याप एकाही पोलीस अधिका-यावर कारवाई केलेली नाही. परिणामी आम्हाला सरकारची मदत नको, पण दोषींवर कारवाई हवी आहे, अशी ठाम भूमिका सोमनाथ यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी घेतली आहे. तर दोषी पोलीसांवर कठोर कारवाईची मागणी कुटुंबिय सातत्यानं करत आहेत.
न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवाल आला समोर
परभणी हिंसाचार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशीचा हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा दावा प्रशासनाने केला होता. यानंतर शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालावरून, पोलिसांच्या मारहाणीमुळेच सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाल्याचे उघड झाल्यानंतर परभणीत एका पोलीस अधिकाऱ्यासह 2 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं. जवळपास दोन महिन्यांनी ही कारवाई करण्यात आली होती. अशातच आता न्याय दंडाधिकाऱ्यांच्या चौकशीचा अहवालातून धक्कादायक माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. परभणीच्या नवामोंढ पोलीस ठाण्यात सोमनाथ सूर्यवंशीना मारहाण करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
पोलिसांचा काय दावा होता?
न्यायालयीन कोठडीमध्ये असताना सोमनाथ सूर्यवंशीना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना रुग्णालयामध्ये नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केला होता.