न्यायवैद्यक विज्ञानतज्ञांची साक्ष नोंदवण्यात येणार
पुणे : नसरापूर येथे चिमुरडीवर अत्याचार करून खून केल्याप्रकरणी गुरूवारी (दि. ४) विशेष न्यायालयात सुनावणी झाली. या झालेल्या सुनावणीदरम्यान सात वैद्यकीय अधिकार्यांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. आत शुक्रवारी (दि.5) न्यायवैद्यक विज्ञानतज्ञांची साक्ष नोंदवण्यात येणार आहे.
भोर तालुक्यातील नसरापूर येथे 1 मे रोजी साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले होते. याप्रकरणी आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५, रा. भोर) याच्याविरोधात राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात या संवेदनशील खटल्याची सुनावणी सुरू आहे. त्यामध्ये आतापर्यंत एकूण १५ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध १ हजार १०० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणाची विशेष न्यायालयात नियमित इन-कॅमेरा सुनावणी सुरू आहे.
दरम्यान, या खटल्यात विशेष सरकारी वकील अॅड. अजय मिसर यांनी एकून ८२ साक्षीदारांची यादी न्यायालयात सादर केली आहे. त्यापैकी आत्तापर्यंत एकून ३० साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. यापूर्वी तीन प्रत्यक्षदर्शी मुलांची साक्ष मंगळवारी विशेष न्यायालयात नोंदविण्यात आली. आरोपीला पीडितेसमवेत पत्र्याच्या शेडमध्ये पाहिल्याचे तिन्ही मुलांनी निर्भिडपणे न्यायालयासमोर सांगितले.
आरोपीलाही मुलांनी ओळखले
येरवडा कारागृहात झालेल्या ओळखपरेडमध्ये आणि न्यायालयात ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे हजर असलेल्या आरोपीलाही मुलांनी ओळखले. त्यामध्ये आरोपीला पीडितेसमवेत गुन्ह्याच्या घटनास्थळी पाहणाऱ्या तीन मुलांची नोंदविली गेली होती.
सहा साक्षीदारांनी यापूर्वी नोंदवली साक्ष
नसरापूर येथील लैंगिक अत्याचार आणि खून प्रकरणात विशेष न्यायालयात सहा साक्षीदारांनी साक्ष नोंदवली आहे. त्यामध्ये पीडितेची आई, वडील, पीडितेच्या मृत्यूच्या कारणांचा पंचनामा करणारे पंच आणि आरोपीला पीडितेसमवेत पाहणाऱ्या साक्षीदारांचा समावेश आहे. दरम्यान, आरोपीविरोधात दाखल आरोपपत्रात पुरावा नष्ट केल्याचे कलम वाढविण्याचा अर्ज सरकार पक्षातर्फे करण्यात आला.
ग्रामस्थांचीही न्यायालयात साथ
आरोपीने पीडितेचे अपहरण केल्यानंतर तिचा शोध घेणाऱ्या तीन ग्रामस्थांनीही न्यायालयासमोर साक्ष नोंदवली. सीसीटीव्ही चित्रीकरणात पीडितेला घेऊन जाणाऱ्या आरोपीला साक्षीदारांनी ओळखले. यापैकी दोन साक्षीदारांनी पीडितेला आरोपीसमवेत बघितल्याचे न्यायालयासमोर सांगितले.






