सौजन्य - सोशल मिडीया
सासवड : अन्न आणि औषध प्रतिबंधक विभागाने संपूर्ण राज्यात बेकायदेशीर धंदे आणि भेसळ करणाऱ्या विरोधात कारवाईचे जोरदार सत्र सुरु केले असल्याने बेकायदेशीर धंदे आणि भेसळ करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. संपूर्ण राज्यात कारवाया सुरु असतानाच या विभागाने पुरंदरकडे मोर्चा वळविला आहे. पुरंदरच्या सासवडमध्ये पहिल्याच कारवाईत गुटखा विक्रीचे दुकान सील करून मोठा झटका दिली आहे. या कारवाईने तालुक्यातील मावा, गुटखा, पानमसाला विक्री करणारे कोमात गेले आहेत.
अन्न औषध विभागाचे राज्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार हाती घेतल्यानंतर अन्नात भेसळ करणाऱ्या विरोधात कारवाईला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे मागील दहा वर्षात जेवढ्या कारवाया झालेल्या नसतील त्यापेक्षा अधिक कारवाया केवळ १५ दिवसांत केल्या आहेत. शेकडो दुकाने बंद केली असून, कोट्यावधी रुपयांचा बनावट माल जप्त करून नष्ट केला आहे. त्यांच्या धडक कारवाईमुळे बनावट पनीर, दुध, गुळ तयार करणारी गुऱ्हाळे, मावा, गुटखा, पानमसाला, हॉटेल मधील विविध पदार्थांमध्ये भेसळ करून विक्री करणारे कारखानदार, दुकानदार यांच्यात चांगलीच धडकी भरली आहे.
राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात मोठाल्या कारवाया केल्यानंतर अन्न व औषध प्रतिबंधक विभागाने आता ग्रामीण भागाकडे आपला मोर्चा वळवला आहे. पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील सासवडचा मावा सर्वत्र प्रसिद्ध झाला असून, त्या अनुषंगाने कारवाई करीत सासवडला मावा, गुटखा विक्रीचे दुकान सील केले आहे. विशेष म्हणजे अत्यंत गोपनीय पद्धतीने केलेल्या कारवाईची कुणाला खबरही लागू दिली नाही.
सासवडमध्ये मावा तयार करणारे अनेक मोठे कारखाने सुरु असून, दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. याबाबत कारवाई करण्यासाठी स्थानिक नागरिकांची अनेक वर्षापासूनची मागणी आहे. मात्र अन्न औषध विभागाने याबाबत जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. कोरोनाच्या काळात सासवड पोलिसांनी अनेक कारखान्यांवर कारवाई केली होती. मात्र कोरोनाचा कालावधी संपताच हे धंदे पुन्हा सुरु झाले. दरम्यान सासवडचा मावा संपूर्ण पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध असून हडपसर, कात्रज, पुणे, भोर, नीरा, बारामती आणि परिसरातून लोक मावा खरेदी करण्यासाठी येत असतात.
सासवडला पहिलीच मोठी कारवाई झाल्यानंतर मावा, गुटखा विक्री करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. अनेक दुकानातून मावा तसेच वेगवेगळ्या प्रकारचा गुटखा बंद झाल्याचे पाहायला मिळत आहे. नियमित येणाऱ्या ग्राहकालाच आतल्या हाताने मावा, गुटखा मिळत आहे. अनोळखी ग्राहकाला विनंती करूनही शिल्लक नाही किंवा आम्ही मावा, गुटखा विकत नाही असे सांगताना पाहायला मिळत आहे.






