सौजन्य - नवराष्ट्र टीम
ओतूर : ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन लहान मुलांसह बेपत्ता झालेल्या आदिवासी महिलेचा शोध घेण्यात ओतूर पोलिसांना अवघ्या दोन दिवसांत यश आले आहे. महिला आणि तिची तीनही मुले सुखरूप मिळून आल्याने कुटुंबीयांनी तसेच पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. पोलिसांनी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून महिला व मुलांना त्यांच्या पती आणि नातेवाईकांच्या स्वाधीन केले. पोलिसांच्या तत्परतेमुळे महिला आणि तिची मुले सुखरूप मिळून आल्याने परिसरातून ओतूर पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कांता राजकिरण केदार (वय ३३, रा. टोकाकडे, ता. मुरबाड, जि. ठाणे) या आपल्या तीन मुलांसह सासरच्या गावी बस्ती सावरगाव (ता. जुन्नर) येथे जाण्यासाठी निघाल्या होत्या. माहेरच्या नातेवाईकांनी त्यांना बसमध्ये बसवून दिले होते. त्या बनकर फाटा येथे उतरल्या. दरम्यान, त्यांचे पती त्यांना घेण्यासाठी सायंकाळी बनकर फाटा येथे आले होते. मात्र, महिलेकडे मोबाईल फोन नसल्याने दोघांची भेट होऊ शकली नाही. बराच वेळ प्रतीक्षा करूनही संपर्क न झाल्याने संबंधित महिलेने पुन्हा कल्याणकडे जाणारी बस पकडली आणि मुरबाड तालुक्यातील टोकाकडे येथील आपल्या मामाच्या गावी निघून गेल्या. त्या सासरी न पोहोचल्याने कुटुंबीयांनी चिंतेतून १२ जून २०२६ रोजी ओतूर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
ही शोधमोहीम पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभमकुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे, महिला पोलीस हवालदार मोहिनी जाधव, रेश्मा फापाळे तसेच महिला पोलीस शिपाई खोसे यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.
नातेवाईकांकडे चौकशी
बेपत्ता झालेल्यांमध्ये कांता केदार यांच्यासह अनन्या राजकिरण केदार (वय ९), रुद्र राजकिरण केदार (वय ३) आणि गणेश राजकिरण केदार (वय ७ महिने) यांचा समावेश होता. तक्रार दाखल होताच ओतूर पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम हाती घेतली. बनकर फाटा, ओतूर, जुन्नर परिसर तसेच पारगाव मढ, कल्याण आणि मुरबाड भागातील नातेवाईकांकडे चौकशी करण्यात आली. दोन दिवसांच्या कसून शोधानंतर संबंधित महिला टोकाकडेजवळील एका वस्तीवर आपल्या मुलांसह सुखरूप आढळून आली.






