इन्स्टाग्रामच्या फिल्टरमुळे प्रेमाचा रक्तरंजित अंत, 4 मुलांची आई 26 वर्षीय मुलाच्या प्रेमात झाली वेडी , असा झाला शेवट...
Uttar Pradesh Crime News in Marathi: सोशल मीडियावर अनेक फिचर्समुळे फोटो किंवा व्हिडीओ एडिट करणं शक्य होतं.फोटोला आकर्षक करण्यासाठी अनेकजण इन्स्टाग्रामवरील फिल्टरचा जास्त प्रमाणात वापर करत असतात. मात्र हेच फिल्टर एका महिलेच्या जीवावर बेतल आहे. उत्तर प्रदेशमधील एका महिलेने स्वत:चा फोटो फ्लिटर करून सोशल मीडियावर वापरला होता. यानंतर या महिलेची हत्या झाल्याची माहिती मिळाली. या महिलेला 4 मुलं देखील होती. नेमकं काय आहे प्रकरण?
उत्तर प्रदेशमधील मैनपुरीमध्ये, ५२ वर्षीय महिलेला तिच्या अर्ध्या वयाच्या मुलावर प्रेम झाले. दोघेही इन्स्टाग्रामवरून एकमेकांच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकले होते. महिलेने इंस्टाग्रामवर फिल्टर वापरल्यामुळे मुलाला तिचे वय कळले नाही. परंतु दीड वर्षातच महिलेचे हे प्रेम तिच्या आयुष्याचे शत्रू बनले. मुलाने तिचा गळा दाबून हत्या केली. सुमारे एक महिन्यानंतर, ‘खूनी’ला पोलिसांनी पकडले आहे. त्याने गुन्हा करण्यामागील संपूर्ण कहाणी सांगितली आहे.
उत्तर प्रदेशमधील मैनपुरीच्या कोतवाली पोलीस स्टेशन परिसरात एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला, ज्या मृतदेहाची ओळख राणी म्हणून झाली, ती फर्रुखाबादची रहिवासी होती. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गळा दाबून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. या अंध हत्याकांडाची उकल करण्यासाठी पोलिसांनी तीन पथके तयार केली. सखोल तपासानंतर पोलिसांनी आरोपी अरुण राजपूतला अटक केली. आरोपीने इन्स्टाग्रामद्वारे महिलेशी मैत्री केली होती. अरुणने चौकशीदरम्यान सांगितले की, महिलेने तिचे वय लपवण्यासाठी फिल्टरचा वापर केला.
मैनपुरी पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मृत महिला राणी (५२) आणि आरोपी अरुण राजपूत (२६) यांची दीड वर्षांपूर्वी इंस्टाग्रामवर मैत्री झाली. राणीलाही चार मुले आहेत. मैत्रीनंतर दोघांमध्ये पैशांची देवाणघेवाण सुरू झाली. एसपी सिटी अरुण कुमार सिंह म्हणाले की, महिलेने तिचे वय लपवण्यासाठी इन्स्टाग्रामवर फिल्टरचा वापर केला होता, ज्यामुळे आरोपी तिच्या जाळ्यात अडकला. नंतर, महिलेने अरुणवर लग्न करण्यासाठी आणि तिने दिलेले १.५ लाख रुपये परत करण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली.
आरोपी अरुण राजपूतने पोलिसांना सांगितले की, तो महिलेच्या सततच्या दबावामुळे नाराज होता. १० ऑगस्ट रोजी त्याने राणीला मैनपुरी येथे बोलावले. दोघेही खारपरी बांबा जवळील झुडपात भेटले, जिथे राणीने पुन्हा त्याच्याशी लग्न करण्याची आणि पैसे परत करण्याची चर्चा केली आणि पोलिसांकडे तक्रार करण्याची धमकीही दिली. रागाच्या भरात अरुणने राणीचा दुपट्ट्याने गळा दाबला आणि घटनास्थळावरून पळून गेला. पोलिसांनी राणीच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स काढले, ज्यावरून आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले.
सध्या पोलिसांनी आरोपी अरुण राजपूतला अटक केली आहे. त्याच्याकडून महिलेचे दोन मोबाईल फोन देखील जप्त करण्यात आले आहेत. चौकशीदरम्यान आरोपीने आपला गुन्हा कबूल केल्याचे एसपी सिटी यांनी सांगितले. हत्येनंतर आरोपीने महिलेच्या मोबाईलमधून सिम काढून फेकून दिले होते. त्याला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.