संग्रहित फोटो
पुणे : ”ड्रग्ज फ्री सिटी” करण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली असून, एका सराईत गुन्हेगाराकडून २७ लाख रुपयांचे ड्रग्ज तसेच शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडल्याने मोठी खळबळ देखील उडाली असून, हे ड्रग्ज कोठून आणले यादृष्टीने तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांनी २७ लाख ६० हजारांचे ९२० ग्रॅम अमली पदार्थ आणि एक पिस्तुल, सात जिवंत काडतुसे असा एकूण २८ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अक्रम अजिज शेख (वय ३२, रा. गुलटेकडी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. वरिष्ठ निरीक्षक संगीता जाधव, पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक, उपनिरीक्षक अल्फ़ाज शेख, पोलिस हवालदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाने, पोलिस अंमलदार अभिजित चव्हाण, गोपाळ मदने व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. तीन दिवसांपुर्वी वानवडी पोलिसांत एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्यात अक्रम शेख याचा सहभाग समोर आला होता. त्यानंतर तो पसार झाला होता. त्याचा शोध वानवडी पोलिस घेत होते.
हे सुद्धा वाचा : पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत जाहिरात फलकांवर ‘हातोडा’; महापालिकेची धडक कारवाई
कॅम्प परिसरात रचला होता सापळा
यादरम्यान, फरार अक्रम शेख हा पुणे कॅम्प परिसरात येणार असल्याची माहिती वानवडी पोलिस ठाण्याच्या तपास पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कॅम्प परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी करून त्याच्या घराची झडती घेतली असता, पोलिसांना पांढऱ्या रंगाची २७ लाख ६० हजार रुपये किमतीची ९२० ग्रॅम अमली पावडर मिळून आली. तर त्याच्याकडे ४७ हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्तुल, दोन मॅगझीन आणि सात जिवंत काडतुसे सापडली. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने हा माल कोठून आणला आणि त्याचे कोणाशी लागेबांधे आहेत, याचा सखोल तपास वानवडी पोलिस करत आहेत.






