आधी प्रेमविवाह केला अन् नंतर हुंड्यासाठी छळ झाला; अखेर नवविवाहितेची विष प्राशन करून आत्महत्या (File Photo : Suicide)
पुणे : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातच आंबेगाव परिसरात प्रेमविवाह केलेल्या २० वर्षीय तरुणीने कथित हुंड्याच्या छळाला कंटाळून कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी पती, सासू व नणंदेवर गुन्हा नोंदवला आहे.
याबाबत मृत तरुणीच्या आईने आंबेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, पती अजित दशरथ पवार (वय २५), सासू अनुसया दशरथ पवार (वय ५५) आणि नणंद अलका लहू जाधव (वय ३०) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अजित पवार हा मूळचा लातूर जिल्ह्यातील असून, सध्या पुण्यात वास्तव्यास आहे. वर्षभरापूर्वी त्याने संबंधित तरुणीसोबत प्रेमविवाह केला होता. मात्र, विवाहानंतर पती व त्याच्या कुटुंबीयांकडून तरुणीला हुंड्यासाठी त्रास दिला जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. माहेरहून दागिने आणावेत, अशी मागणी करत आरोपींकडून सातत्याने मानसिक छळ करण्यात येत होता. हा त्रास असह्य झाल्याने तरुणीने कीटकनाशक प्राशन करून जीवन संपविल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, मुलीचा हुंड्यासाठी छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत आईने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार आंबेगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. सध्या याप्रकरणाचा तपास आंबेगाव पोलिसांकडून केला जात आहे.
बीडमध्ये विवाहितेची आत्महत्या
दुसऱ्या एका घटनेत, एका २० वर्षीय विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. व्यवसायासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत सतत मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात पतीसह सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने पुन्हा एकदा हुंडाबळीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.






