( फोटो सौजन्य- सोशल मीडिया )
मराठी चित्रपटसृष्टीतील बहुचर्चित हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘भूतम भयम्’चा बहुप्रतीक्षित टीझर अखेर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विनोद, रहस्य, थरार आणि भव्य दृश्यरचना यांचा संगम असलेल्या या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.
चित्रपटात रहस्यमय घटनांमध्ये अडकलेल्या सात मित्रांची कथा पाहायला मिळणार आहे. सोशल मीडियावर लोकप्रिय असलेली ‘ऑरेंज ज्यूस गँग’ पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार असल्याने चाहत्यांमध्ये विशेष उत्साह आहे. सौरभ घाडगे, शुभम जाधव, सिद्धांत सरफरे, नील साळेकर, करण सोनावणे, पुष्कराज चिरपुटकर आणि मनमीत पेम यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत.
टीझरमधील भव्य दृश्यरचना, दर्जेदार व्हिज्युअल इफेक्ट्स आणि सिनेमॅटिक स्केलने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. दिग्दर्शक रामचंद्र अरुण गांवकर यांनी सांगितले की, “टीझर हा चित्रपटाच्या विश्वाची फक्त एक छोटीशी झलक आहे. ‘भूतम भयम्’मध्ये विनोद आणि भय यांचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार आहे.”
दरम्यान, लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा नुकताच पार पडला. या शुभप्रसंगी चित्रपटाच्या यशासाठी ‘भूतम भयम्’च्या टीमने लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देत बाप्पाचे आशीर्वाद घेतले. यावेळी सौरभ घाडगे, सिद्धांत सरफरे, नील साळेकर आणि दिग्दर्शक रामचंद्र अरुण गांवकर उपस्थित होते. मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांच्या हस्ते चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.
या प्रसंगी रामचंद्र अरुण गांवकर म्हणाले, “माझं बालपण लालबाग परिसरात गेलं. लालबागच्या राजाशी माझं खास नातं आहे. याच पवित्र स्थळी ‘भूतम भयम्’च्या पोस्टरचं अनावरण होणं माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. गणरायाच्या कृपेने आणि प्रेक्षकांच्या प्रेमाने हा चित्रपट नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास आहे.”
झी स्टुडिओज प्रस्तुत आणि कायरा कुमार क्रिएशन्स निर्मित ‘भूतम भयम्’ या चित्रपटाची निर्मिती नरेन कुमार आणि महेश ज्ञानदेव कोरडे यांनी केली असून कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शनाची धुरा रामचंद्र अरुण गांवकर यांनी सांभाळली आहे. हॉरर, कॉमेडी आणि मनोरंजनाचा तिहेरी डोस घेऊन येणारा हा चित्रपट 24 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.






