(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Alia Bhatt On Assam Floods 2026: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांच्यानंतर आता अभिनेत्री आलिया भट्ट हिनेही आसाममधील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत तिने चाहत्यांना आणि देशवासियांना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येण्याची विनंती केली आहे.
आलियाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, “सध्या आपल्या देशातील अनेक भाग पूरस्थितीचा सामना करत आहेत. त्यामध्ये आसामची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. ६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून लाखो लोक बेघर झाले आहेत. अनेक कुटुंबांनी आपली घरे, शेती, पशुधन आणि काहींनी तर आपल्या प्रिय व्यक्तींनाही गमावले आहे.”
तिने पुढे म्हटले, “हे दरवर्षी घडते, तरीही आपण पुरेशा तयारीत नसतो. आसामला तातडीच्या मदतीची गरज आहे. परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत दीर्घकालीन मदतीची आवश्यकता असेल. येत्या काही दिवसांत स्थानिक संस्थांमार्फत मदत करण्याचे मार्ग मी माझ्या सोशल मीडियावर शेअर करेन.”
आलियाचे हे आवाहन अशा वेळी समोर आले आहे, जेव्हा आसाममध्ये पूरस्थितीमुळे लाखो नागरिकांना फटका बसला आहे. यापूर्वी सलमान खाननेही त्याच्या धर्मादाय संस्थेच्या माध्यमातून आणि आसाममधील फॅन क्लबच्या सहकार्याने मदत मोहीम सुरू केली होती.
याशिवाय अभिनेत्री भूमी पेडणेकर, अदा शर्मा, राशी खन्ना तसेच गायक गुरू रंधावा आणि पापन यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदतीचे आवाहन केले आहे.
दरम्यान, आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (ASDMA) च्या माहितीनुसार, शिवसागर, चराईदेव, गोलाघाट, जोरहाट, नागाव, सोनितपूर आणि कामरूप या सात जिल्ह्यांतील ६२२ गावांमध्ये पुराचे पाणी शिरले असून ३,३२,६३९ नागरिक या आपत्तीमुळे प्रभावित झाले आहेत. पूरामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचेही नुकसान झाले असून अनेक हेक्टर जमीन अद्याप पाण्याखाली आहे.






