(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Kalyani Pandit Exclusive Interview :मराठी मनोरंजनविश्वात सासू-सुनेच्या नात्यावर आधारित अनेक कथा प्रेक्षकांनी पाहिल्या आहेत. मात्र, zee5 मराठीवरील ‘अगं आई अहो आई’ ही वेब सिरीज या नात्याकडे एका वेगळ्या आणि सकारात्मक दृष्टिकोनातून पाहते. या मालिकेनिमित्त ‘नवराष्ट्र’ने लेखिका कल्याणी पंडित यांच्याशी खास संवाद साधला. यावेळी त्यांनी मालिकेची प्रेरणा, पात्रांची जडणघडण, ‘ग्रीन फ्लॅग हजबंड’ची संकल्पना, ‘प्रेमाला Conditions Apply’शी असलेला समान धागा आणि मराठी मनोरंजनविश्वातील बदलत्या कथांबाबत मनमोकळेपणाने मत व्यक्त केले.
मालिकेच्या कथेबाबत बोलताना कल्याणी पंडित म्हणाल्या की, ‘अगं आई अहो आई’ ही कथा त्यांच्या घरात घडलेल्या एका छोट्याशा प्रसंगातून प्रेरित आहे. त्यांच्या काकू आणि चुलत बहिणीमधील एक प्रसंग त्यांना खूप भावला होता. लेखक म्हणून आजूबाजूच्या घटना सतत टिपण्याची सवय असल्याने ती घटना मनात कायम राहिली आणि त्यातूनच या मालिकेचा जन्म झाला. सासू-सुनेच्या नात्यासोबतच स्वतःचं आणि आईचं नातंही या कथेत गुंफल्याचं त्यांनी सांगितलं. आई-मुलीच्या नात्यातील प्रेम, भांडणं, मैत्री आणि शिस्त या सगळ्या भावना या मालिकेतून मांडण्याचा प्रयत्न केल्याचं त्या म्हणाल्या.
घरच्यांच्या प्रतिक्रियेबद्दल विचारलं असता त्यांनी सांगितलं की, मालिका पूर्ण झाल्यानंतर आईला आणि कुटुंबीयांना याबाबत सांगितलं. आईने गंमतीने, “मी तुला एवढं ओरडले का?” असा प्रश्न विचारला होता. त्यावर स्क्रीनसाठी थोडा मसाला आवश्यक असतो, असं उत्तर आपण दिल्याचं त्यांनी हसत सांगितलं. तसेच, काकू आणि चुलत बहिणीला ही मालिका त्यांच्या आयुष्यातील प्रसंगावरून प्रेरित असल्याचं सांगितल्यावर त्यांनाही खूप आनंद झाल्याचं त्यांनी नमूद केलं.
मालिकेतील सर्वात आव्हानात्मक पात्र कोणतं, यावर बोलताना त्यांनी सांगितलं की महिला पात्रं सहज सुचत गेली, मात्र नवऱ्याचं पात्र अत्यंत महत्त्वाचं होतं. त्याचा स्वभाव आणि दृष्टिकोन योग्य प्रकारे मांडणं गरजेचं होतं. अभिनेता सुयोग गोऱ्हेने ही भूमिका उत्कृष्ट साकारल्यामुळे आज त्याला सोशल मीडियावर ‘ग्रीन फ्लॅग हजबंड’ म्हणून मिळणारा प्रतिसाद अत्यंत सुखावणारा असल्याचं त्यांनी सांगितलं.
‘प्रेमाला Conditions Apply’ आणि ‘अगं आई अहो आई’ या दोन्ही मालिकांमधील समान धाग्याबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की, दोन्ही मालिकांतील महिला पात्रं वास्तववादी आहेत. त्यांना कोणत्याही परफेक्ट चौकटीत न बसवता, आजूबाजूला दिसणाऱ्या सामान्य मुलींसारखं साकारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यांचे गुण, दोष आणि भावविश्व मोकळेपणाने मांडता आलं, हाच दोन्ही मालिकांमधील समान दुवा असल्याचं त्या म्हणाल्या.
मराठी मालिकांमध्ये कोणत्या प्रकारच्या कथा यायला हव्यात, यावर त्यांनी स्पष्ट मत व्यक्त केलं. एकाच प्रकारच्या कथा न सांगता समाजातील विविध पैलू मांडणाऱ्या आणि प्रत्येक प्रेक्षकाला आपलं वाटतील अशा कथा यायला हव्यात. कंटेंटमध्ये जितकी विविधता असेल, तितकं मराठी मनोरंजनविश्व समृद्ध होईल, असं त्यांनी सांगितलं.
भविष्यातील लेखनाबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, त्या स्वतः प्राणीप्रेमी आहेत. त्यामुळे प्राणी कथानकाच्या केंद्रस्थानी असलेली कथा लिहिण्याची त्यांची इच्छा आहे. त्याचबरोबर लहान मुलांसाठीही काहीतरी वेगळं लिहायची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
‘अगं आई अहो आई’ आणि ‘प्रेमाला Conditions Apply’ यापैकी कोणती मालिका अधिक जवळची आहे, या प्रश्नावर त्यांनी दोन्ही मालिका आपल्या मनाच्या अत्यंत जवळच्या असल्याचं सांगितलं. ‘अगं आई अहो आई’ हे त्यांच्या लेखनाच्या सुरुवातीच्या काळातील काम असलं, तरी ‘प्रेमाला Conditions Apply’ लिहिताना लेखक म्हणून अधिक परिपक्व झाल्याचं त्यांनी नमूद केलं.
हॉरर वगळता कोणत्याही विषयावर लिहायला आवडेल, असं सांगताना त्यांनी मनोरंजनासोबत संवेदनशीलताही महत्त्वाची असल्याचं स्पष्ट केलं.
नवीन लग्न झालेल्या मुली आणि सासू-सुनेच्या नात्याबद्दल बोलताना त्यांनी मालिकेतील एक संवाद आवर्जून सांगितला – “आमच्या बाबतीत जे झालं, ते आमच्या सुनांच्या बाबतीत होऊ द्यायचं नाही.” जुन्या चुकीच्या गोष्टी पुढच्या पिढीकडे न नेता तिथेच थांबवण्याचा प्रयत्न झाला, तर नातेसंबंध अधिक सुंदर होतील, असा संदेश त्यांनी या मुलाखतीतून दिला.






