(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Shweta Tiwari Ex Husband Raja Chaudhary: बॉलिवूड अभिनेत्री श्वेता तिवारी आणि तिचे माजी पती राजा चौधरी यांच्यातील वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी चर्चेचं कारण ठरलं ते मुलगी पलक तिवारीच्या ताब्याच्या बदल्यात ९३ लाख रुपयांचा फ्लॅट स्वीकारल्याच्या आरोपांवर राजा चौधरी यांनी दिलेलं स्पष्टीकरण.
श्वेता तिवारीने यापूर्वी एका मुलाखतीत दावा केला होता की, घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान राजा चौधरी यांनी मुलगी पलकच्या संयुक्त मालकीचा प्रस्ताव नाकारून फ्लॅटची संपूर्ण मालकी मागितली होती. त्यावेळी त्यांनी, “मालमत्तेसाठी मी माझ्या मुलीचाही त्याग करेन,” असं म्हटल्याचा आरोप श्वेताने केला होता.
मात्र, आता सिद्धार्थ कन्नन यांना दिलेल्या मुलाखतीत राजा चौधरी यांनी या आरोपांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी सांगितले की, २००७ ते २०१२ या काळात घटस्फोटाचं प्रकरण न्यायालयात सुरू होतं आणि ते प्रत्येक सुनावणीला हजर राहत होते. तसेच, न्यायालयाने मुलगी पलकला भेटण्याची परवानगी दिली होती, मात्र श्वेता तिला भेटण्यासाठी कधीच घेऊन आली नाही, असा दावाही त्यांनी केला.
राजा चौधरी यांनी पुढे सांगितले की, वादाच्या काळात त्यांना राहण्यासाठी घर मिळण्यात अडचणी येत होत्या. संबंधित १ बीएचके फ्लॅट त्यांच्या वडिलांनी लग्नाच्या वेळी खरेदी केला होता, त्यासाठी त्यांनी डाउन पेमेंट भरले होते, तर उर्वरित ईएमआय तो आणि श्वेता मिळून भरत होते. त्यामुळे हा फ्लॅट आपल्या वाट्याचा असल्याचा दावा त्यांनी केला.
त्यांच्या म्हणण्यानुसार, “मला फक्त शांततेने जगण्यासाठी राहण्याची जागा हवी होती. मी इतर मालमत्तेवर कोणताही दावा केला नाही. त्यामुळे मुलगी आणि मालमत्ता यांची तुलना करणं चुकीचं आहे.”
राजा चौधरी यांनी श्वेता तिवारींच्या आरोपांना फेटाळून लावत, त्यांनी स्वतःच्या हक्काचा फ्लॅट मागितला होता, मुलीचा त्याग केला नव्हता, असा दावा केला आहे. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा श्वेता-राजा यांच्यातील जुन्या वादाची चर्चा रंगली आहे.






