( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Kamali Serial: झी मराठीवरील ‘कमळी’ मालिका सध्या रंजक वळणावर आली आहे. कमळी पुन्हा अन्नपूर्णा हाऊसमध्ये परतली असून तिचा आणि कामिनीचा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. दुसरीकडे, साई भंडाऱ्याच्या पार्श्वभूमीवर कमळी आणि सरोज पुन्हा समोरासमोर येणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सरोजवर झालेल्या गोळीबारानंतर तिच्या पात्राचं पुढे काय होणार, याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात असताना, सरोजची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री योगिनी चौकने या संपूर्ण ट्रॅकबाबतचा अनुभव शेअर केला आहे.
योगिनी म्हणाली, “सरोजला गोळी लागल्यानंतर मलाच वाटलं होतं की आता माझं पात्र मालिकेतून संपणार की काय. पुढे कथेत काय होणार, याची आम्हा कलाकारांनाही आधी माहिती नसते. त्यामुळे मी क्रिएटिव्ह टीमला विचारलं. तेव्हा त्यांनी सरोज वाचणार असल्याचं सांगितलं आणि ते ऐकून मला दिलासा मिळाला.”
गोळी लागण्याचा सीन पहिल्यांदाच करत असल्याने त्या खूप उत्सुक होत्या. “पडद्यावर तो प्रसंग वास्तव वाटावा म्हणून शरीराची हालचाल, चेहऱ्यावरील भाव आणि प्रत्येक बारकाव्याकडे विशेष लक्ष दिलं. दिग्दर्शकांनी प्रत्येक गोष्ट समजावून सांगितली. रक्त उडण्याचे इफेक्ट आणि संपूर्ण तांत्रिक प्रक्रिया जवळून पाहण्याची ही माझ्यासाठी पहिलीच वेळ होती. अभिनेत्री म्हणून हा अनुभव खूप वेगळा आणि अविस्मरणीय होता,” असे त्यांनी सांगितले.
हा भाग प्रसारित झाल्यानंतर प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रतिसादाने ती भारावून गेली. “‘सरोज आता मरणार का?’, ‘तू मालिकेतून बाहेर पडलीस का?’, ‘नवीन मालिका स्वीकारलीस का?’ असे अनेक फोन आणि मेसेज मला आले. मात्र मी सर्वांना एवढंच सांगत होते की, ‘थोडा ब्रेक आहे, पण मी पुन्हा येणार आहे’,” असं ती हसत म्हणाली.
साई भंडाऱ्यातील गोळीबारानंतर पडण्याचा सीनही तितकाच आव्हानात्मक होता. कमळीचा हात सुटण्याचा प्रसंग वास्तवदर्शी दिसावा यासाठी अनेक रिटेक्स करावे लागले. या संपूर्ण चित्रीकरणातून स्टंट सीन्स कसे साकारले जातात, याचा जवळून अनुभव मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. यासाठी त्यांनी लेखक, दिग्दर्शक आणि संपूर्ण निर्मिती टीमचे आभार मानले.
दरम्यान, आगामी भागांमध्ये कमळीला तिची आई जिवंत असल्याची जाणीव होणार असून, त्यानंतर कमळी आणि सरोजची भावनिक भेट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अपघातानंतर सरोजची स्मरणशक्ती का कमी झाली, ती भूतकाळात अडकल्यासारखी का वागते आणि या दोघींच्या नात्याला पुढे कोणते नवे वळण मिळणार, याचा उलगडा येत्या भागांमध्ये होणार आहे.






