( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Rasika Sunil Tamil Viral News : ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली शनाया, अर्थात अभिनेत्री रसिका सुनील, आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती लवकरच ‘जीडीएन’ (GDN) या बहुभाषिक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला आणि त्यावेळी रसिकाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
‘जीडीएन’ हा चित्रपट प्रसिद्ध संशोधक आणि उद्योगपती जी. डी. नायडू यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात आर. माधवन मुख्य भूमिकेत झळकणार असून सत्यराज, जयराम, प्रियमणी, दुशारा विजयन, विनय राय यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या स्टारकास्टमध्ये मराठमोळी रसिका सुनीलही एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. कृष्णकुमार राजकुमार दिग्दर्शित हा चित्रपट १७ जुलै २०२६ रोजी तमीळ, हिंदी, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
ट्रेलर लॉन्च सोहळ्यात गुलाबी साडीतील रसिकाच्या मोहक लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. याच कार्यक्रमातील तिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये एका पापाराझीने रसिकाला तमीळमध्ये प्रश्न विचारला. त्यावर ती हसत “No Tamil” असं म्हणाली आणि तिला तमीळ भाषा येत नसल्याचं सांगितलं. त्यानंतर त्या पापाराझीने इंग्रजीत संवाद साधत, “तुझ्या गालावर काहीतरी लागलं आहे… क्युटनेस!” असं म्हणत तिचं कौतुक केलं. हे ऐकून रसिका मनापासून हसू लागली.
View this post on Instagram
यानंतर त्या पापाराझीने स्वतः इन्फ्लुएन्सर असल्याचं सांगत आपल्या चॅनेलला पाठिंबा देण्याची विनंती केली. त्यावर रसिकानेही हसत-हसत त्याच्या चॅनेलला सपोर्ट करण्याचं आवाहन केलं. या दोघांमधील हा हलकाफुलका आणि दिलखुलास संवाद सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नेटकऱ्यांकडून त्याला भरभरून पसंती मिळत आहे.
मराठी मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकणारी रसिका सुनील आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप पाडण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्या या नव्या प्रवासासाठी चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.






