( फोटो सौजन्य- सोशल मीडिया )
अभिनेता समीर खांडेकर ने ‘बनवाबनवी’ नाटकाच्या प्रवासाविषयी बोलताना अनेक रंजक आठवणींना उजाळा दिला. एका कॉफी शॉपमधील अनपेक्षित भेटीतून या नाटकाचा जन्म झाल्याचे त्याने सांगितले.
समीर खांडेकर म्हणाला, “एका वेगळ्या प्रोजेक्टच्या मिटिंगसाठी मी कॉफी शॉपमध्ये गेलो होतो. तो प्रोजेक्ट तर झाला नाही, पण तिथेच माझी भेट प्रभात थिएटर्सचे निर्माता हर्षद कठापूरकर यांच्याशी झाली. त्यांनी मला ‘बनवाबनवी’ नाटक लिहिण्याची आणि दिग्दर्शनाची ऑफर दिली. गंमत म्हणून दिलेला तो होकार आयुष्य बदलणाऱ्या प्रवासाची सुरुवात ठरेल, याची तेव्हा कल्पनाही नव्हती.”
तो पुढे म्हणाला की, नाटकाच्या मुहूर्ताच्या दिवशी त्याच्याकडे केवळ ‘बनवाबनवी’ हे नाव होते. “कथा नव्हती, पात्रं नव्हती, संवाद नव्हते. होतं फक्त एक स्वप्न आणि ते पूर्ण करण्याची जिद्द,” असे त्याने सांगितले.
‘बनवाबनवी’ हे मराठी रंगभूमीवर कंटेंट क्रिएटर्सना केंद्रस्थानी ठेवून सादर करण्यात आलेले वेगळ्या धाटणीचे नाटक ठरले. लाखो फॉलोअर्स असलेले अनेक कंटेंट क्रिएटर्स या नाटकासाठी एकत्र आले. रंगमंचावरील अनुभव नसतानाही त्याने नाटकासाठी प्रचंड मेहनत घेतल्याचे हे त्याने सांगितले.
“सोशल मीडियावर लोकप्रिय असलेली ही मंडळी नाटकासाठी पुन्हा विद्यार्थ्यांसारखी शिकू लागली. दिग्दर्शक म्हणून मी त्याना घडवत होतो, पण तेही मला तितकंच घडवत होते. त्यांच्या विनोदाच्या शैलीचा विचार करूनच नाटकातील विनोद लिहिला गेला,” असे तो म्हणाला.
या नाटकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नाटक पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांपैकी मोठा वर्ग प्रथमच रंगभूमीचा अनुभव घेत होता. “लोक त्यांच्या आवडत्या कंटेंट क्रिएटरला पाहायला आले असतील, पण त्यातून त्याची नाळ रंगभूमीशी जोडली गेली, तर त्यापेक्षा मोठं यश दुसरं नाही,” असे समीर खांडेकरने सांगितले.नवीन पिढीला नाटकाकडे आकर्षित करण्याच्या प्रयत्नात ‘बनवाबनवी’ने छोटासा का होईना, पण महत्त्वाचा वाटा उचलल्याचा अभिमानही त्याने व्यक्त केला.






