मराठी तरुणाची डिजिटल क्रांती! ‘Cockroach Janta Party’मागचा चेहरा कोण? जाणून घ्या अभिजीत दिपके यांची कहाणी
छत्रपती संभाजीनगरमधील एका सामान्य मराठी कुटुंबातून आलेल्या अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उभी केलेली ही चळवळ आता राष्ट्रीय चर्चेचा विषय बनली आहे. युवकांमधील असंतोष, वाढती महागाई, बेरोजगारी, परीक्षा पेपरफुटी, माध्यमांवरील आरोप आणि राजकीय व्यवस्थेविरोधातील भावना यांना डिजिटल व्यासपीठ देण्याचा प्रयत्न या मोहिमेतून होत असल्याचे दिसत आहे.
Cockroach Janta Party: ‘कॉकरोच जनता पार्टी’चा धुमाकूळ; सोशल मीडिया …
अभिजीत भगवानराव दीपके हे मूळचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज परिसरातील रहिवासी आहेत. मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात त्यांचे बालपण गेले. लहानपणापासूनच त्यांना सामाजिक आणि राजकीय घडामोडींमध्ये रस होता. शालेय जीवनात वक्तृत्व, लेखन आणि वाचन याची आवड असलेल्या अभिजीत यांनी नंतर माध्यम आणि संवाद क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला.
उच्च शिक्षणासाठी ते पुण्यात आले. येथे त्यांनी पत्रकारिता आणि डिजिटल कम्युनिकेशनचा अभ्यास केला. पुण्यातील शिक्षणादरम्यान सोशल मीडिया, राजकीय संवाद आणि जनमत निर्मिती यावर त्यांनी विशेष अभ्यास सुरू केला. त्यांनी ब्रॉडकास्ट जर्नालिझमचे शिक्षण पूर्ण केले आणि डिजिटल मीडियामधील बदलत्या ट्रेंडचा सखोल अभ्यास केला.
सध्या अभिजीत दीपके अमेरिकेतील Boston University येथे जनसंपर्क आणि राजकीय संवाद विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे. ते पॉलिटिकल कम्युनिकेशन स्ट्रॅटेजिस्ट म्हणूनही काम करत असून डिजिटल मोहिमा, सार्वजनिक संवाद आणि सोशल मीडिया नॅरेटिव्ह यावर त्यांचा विशेष अभ्यास आहे.
‘Cockroach Janta Party’ची सुरुवात कशी झाली?
अभिजीत दीपके यांच्या मते, व्यवस्थेविरोधात आवाज उठवणाऱ्या युवकांविषयी वापरल्या गेलेल्या काही वक्तव्यांमुळे त्यांच्यात प्रचंड नाराजी निर्माण झाली. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाही आणि संविधानिक हक्कांबाबत सुरू झालेल्या चर्चांदरम्यान त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट केली.
त्या पोस्टमध्ये त्यांनी प्रश्न विचारला होता — “जर व्यवस्थेविरोधात आवाज उठवणाऱ्या तरुणांना ‘कॉकरोच’ समजले जात असेल, तर हे सगळे ‘कॉकरोच’ एकत्र आले तर काय होईल?”
याच संकल्पनेतून ‘Cockroach Janta Party’चा जन्म झाला. सुरुवातीला उपरोधिक डिजिटल मोहिम म्हणून सुरू झालेली ही चळवळ काही तासांतच सोशल मीडियावर व्हायरल झाली. युवकांनी मोठ्या प्रमाणात या मोहिमेला प्रतिसाद दिला. मीम्स, रील्स, उपरोधिक पोस्ट आणि राजकीय भाष्यांच्या माध्यमातून CJP ने स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली.
देशातील वाढती बेरोजगारी, NEET आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी, महागाई, भ्रष्टाचार आणि राजकीय पक्षांतर यांसारख्या मुद्द्यांवर CJP ने आक्रमक भूमिका घेतली. पारंपरिक राजकीय भाषेपेक्षा वेगळ्या, थेट आणि इंटरनेट संस्कृतीशी जोडलेल्या शैलीत ही मोहीम चालवली गेली. त्यामुळे इंस्टाग्राम आणि X सारख्या प्लॅटफॉर्मवर तरुणांनी मोठ्या प्रमाणात या मोहिमेला पाठिंबा दिला.
विशेष म्हणजे, ‘कॉकरोच जनता पार्टी’चा कथित जाहीरनामाही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. यात न्यायव्यवस्था अधिक पारदर्शक करण्याची मागणी, निवडणूक प्रक्रियेत सुधारणा, पक्षांतर रोखण्यासाठी कठोर कायदे, माध्यम स्वातंत्र्य आणि महिलांना ५० टक्के राजकीय आरक्षण यांसारखे मुद्दे मांडण्यात आले.
Cockroach Janta Party News: ‘व्यवस्थेविरोधात राग ते आमदार खासदारांना’
राजकीय विश्लेषकांच्या मते, ‘Cockroach Janta Party’ ही केवळ सोशल मीडिया ट्रेंड नाही, तर व्यवस्थेविरोधातील वाढत्या असंतोषाचे प्रतीक म्हणूनही पाहिली जात आहे. अभिजीत दीपके यांनी युवकांच्या भावना आणि डिजिटल संस्कृती यांचा संगम साधत एका वेगळ्या प्रकारची राजकीय-डिजिटल चळवळ उभी केली आहे.
ही मोहीम भविष्यात प्रत्यक्ष राजकीय पक्षात रूपांतरित होईल की केवळ डिजिटल आंदोलन म्हणूनच पुढे जाईल, हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, एका मराठी तरुणाने सुरू केलेल्या या मोहिमेने राष्ट्रीय स्तरावर चर्चा निर्माण केली आहे, हे निश्चित.






