नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजपा (Bjp) २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. आगामी काळात कोणत्या मुद्द्यांकडं लक्ष द्यावं, याची टोचणीच नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या (Bjp) खासदारांना नुकतीच दिलीये. कठोर परिश्रमासोबतच ग्राऊंड वर्क म्हणजेच जमिनीवर कार्यकर्त्यांशी संपर्क याकडं विशेष लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. त्यासबोतच सगळ्यांना अचंबा वाटेल असा सल्लाही मोदींनी दिलाय. आगामी काळात वाढणाऱ्या डिजिटल मीडियाचा अंदाज घेत तिथं अधिकाधिक सक्रिय होण्याचा सल्लाही त्यांनी खासदारांना दिलाय. सोशल मीडियाचं महत्त्व जमवून घेत तिथं भाजपाच्या खासदारांची उपस्थिती महत्त्वाची असल्याचं मोदींनी या बैठकीत सांगितलं.
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवा – मोदी
सोशल मीडियावर आपले फॉलोअर्स वाढवण्याचा सल्ला यावेळी पंतप्रधानांनी खासदारांना दिला. त्याचसोबत मतदारांना जोडून ठेवण्यासाठी जमिनीवर अत्यंत कठोरपणे काम करा, असा सल्लाही यावेळी देण्यात आलाय. राज्यसभेवर निवडून आलेल्या खासदारांना यासाठी विशेष प्रयत्न करण्यास सांगण्यात आलंय.
राज्यसभा खासदारांना काय सल्ला ?
भाजपाचे राज्यसभेत ९२ खासदार आहेत. त्या सगळ्यांना मोदींनी सल्ला दिला आहे की, पक्षाने दिलेल्या कार्यक्षेत्रात जबाबदारीनं सक्रीय व्हा. तुमच्या कामानं पक्षातील इतर कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळायला हवं. दिलेल्या मतदारसंघात नियमित प्रवास करण्याचा सल्लाही मोदींनी दिलाय. मतदारसंघात या खासदारांची उपस्थिती मतदारांच्या मनात घर करायला हवं, असा सल्लाही मोदींनी दिलाय.
सरकारबाबतचा लोकांमधला विश्वास वाढवा – मोदी
केंद्र सरकारने गेल्या आठ वर्षांत केलेल्या कामांचा जोरदार प्रचार करण्याचा सल्लाही खासदारांना देण्यात आलाय. जनतेच्या मनात केंद्र सरकारबाबात अधिकाधिक विश्नासाची भावना निर्माण होण्यासाठी काम करण्यास सांगण्यात आलंय. संसदेत सातत्यानं उपस्थित राहा आणि होणाऱ्या चर्चांमध्ये तयारीने उत्तरांसाठी सज्ज व्हा, असंही सांगण्यात आलंय.
खासदारांना सांगितलं कुठं भेटी द्या
पंतप्रधान संग्रहालय, काशी विश्वेश्वर कॉरिडॉर, उज्जैन महाकाल कॉरिडॉर, स्ट्युच्यू ऑफ युनिटी या ठिकाणी दौरे करण्यासही राज्यसभा खासदारांना सांगितलंय. या ठिकाणी तुम्हीही जा आणि मतदरासंघातील नागरिकांनाही जाण्याचा आग्रह करा, असंही मोदींनी सांगितलंय. या ऐतिहासिक स्थानांवर जाण्यासाठी यात्रा आयोजित करण्याचा सल्लाही देण्यात आलाय.
जी-२० च्या कार्यक्रमांत जनसहभाग वाढवा
डिसेंबर २०२२ पासून भारताला एका वर्आषसाठी जी-२०चं अध्यक्षपद मिळालंय. या वर्षभरात देशातील ५५ ठिकाणी ६०० हून अधिक कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमात सामान्य नागरिक कसा सहभागी होईल, यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहनही खासदारांना करण्यात आलंय.