फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Maharashtra Balbharati Textbooks 2026: राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना नव्या अभ्यासक्रमावर आधारित पुस्तके लवकरच उपलब्ध होतील. सध्या इयत्ता दुसरी आणि तिसरीची पाठ्यपुस्तक निर्मितीचे काम सुरू असल्याने ही पुस्तके १० जूननंतर आणि चौथीची पाठ्यपुस्तके १५ जूनच्या आसपास उपलब्ध होतील. तसेच सहावीच्या पुस्तकांच्या निर्मितीचे सध्या काम सुरू असल्याने सहावीची सर्व पुस्तके विद्यार्थ्यांना २५ जूनपर्यंत मिळतील. ही पुस्तके ‘सीबीएसई’ शाळांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पुस्तकांपेक्षा सरस असल्याचे वक्तव्य बालभारतीच्या संचालीका अनुराधा ओक यांनी केले आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, शालेय अभ्यासक्रमात बदल करण्यात येत आहे. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीची नवी पुस्तके विद्यार्थ्यांना मिळणार आहेत, अशी माहिती ओक यांनी दिली.
त्या पुढे म्हणाल्या की, इयत्ता दुसरी आणि तिसरीच्या पुस्तकांच्या छपाईचे काम पूर्ण झाले असून या पुस्तकांचे वितरण सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थी – पालकांना ही पुस्तके १० जूननंतर ती खरेदी करण्यास उपलब्ध होतील. चौथीच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमांव्यतिरिक्त इतर काही माध्यमांच्या पुस्तकांच्या छपाईचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे या इयत्तेची पुस्तके जूनच्या आसपास विद्यार्थ्यांना मिळतील.
ही पुस्तके कमी कालावधीत राज्यातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी बालभारती नेहमी प्रयत्नशील असते. एससीईआरटीकडून सेतू अभ्याक्रम निर्मितीची प्रक्रिया सुरू असून हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकवून पूर्ण होईपर्यंत सर्व पुस्तके विद्यार्थ्यांना मिळालेली असतील.
त्यांनी असेही स्पष्ट केले की, चौथी आणि सहावी या इयत्तांव्यतिरिक्त इतर सर्व इयत्तांची पाठ्यपुस्तके विद्यार्थी पालकांना बाजारपेठेत वेळेत उपलब्ध होतील. समग्र शिक्षा अभियानांतर्गत सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत देण्यात येणारी पुस्तके शाळा सुरू होताना मिळतील. त्यासाठी बालभारतीकडून इयत्ता पहिली ते आठवीच्या सहा कोटी पाठ्यपुस्तकांची छपाई करण्यात आली आहे.






