nilesh lanke
नगर : “मी इंग्रजीतून ते भाषण केले, ते नीलेश लंके यांनी पाठांतर करून नंतर सभेत फाडफाड इंग्रजीतून भाषण करून दाखवावे, तसे झाले तर मी उमेदवारी अर्जच भरणार नाही,’ असे आव्हान भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांना दिले होते. पण हे आव्हान स्वीकारत निलेश लंकेंनी खासदार होताच संसदेत इंग्रजीतून शपथ घेतली. त्यामुळे सध्या निलेश लंकेंचा शपथविधी चांगलाच चर्चेत आला आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या काळात नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात आमदार संग्राम जगताप यांनी ‘रील पेक्षा रियलमध्ये विकास करणाऱ्या खासदाराला आपल्याला संसदेत पाठवायचे असल्याचे म्हटले होते. तसेच, सुजय विखेंचा एक व्हिडीओ दाखवत, काही जण रिल्स बनवू काम केल्याचा दिखावा करतात, असा टोलाही लगावला होता. जगताप यांनी दाखवलेल्या काही व्हिडीओमध्ये विखे पाटील यांच्या संसदेतील इंग्रजी भाषणांचांही समावेश होता.
याच इंग्रजी भाषणांचा धागा पकडून सुजय विखेंनी, ‘मी जेवढे इंग्रजी बोललो तेवढे समोरच्या उमेदवाराने किमान पाठ करून सभेत बोलून दाखवावे. तसे झाले तर मी माझा उमेदवारी अर्जच भरणार नाही.’ असे आव्हान दिले होते. पण निलेश लंके यांनी हे आव्हान स्वीकारले आणि संसदेत इंग्रजी भाषेतून शपथ घेतली. त्यामुळे निलेश लंकेंनी घेतलेली इंग्रजी भाषेतील शपथ राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे.