Untitled design - 1
कोरोना महामारीतून जग आता कुठे सावरत असताना आता पुन्हा कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने जगाची डोकेदुखी वाढवली आहे. या महामारीमुळे जगभरात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अलिकडच्या काळात या आजाराची प्रकरणे कमी झाली असली तरी आताही त्याचे अनेक प्रकार सतत चिंतेचा विषय बनत आहेत. कोरोना व्हायरस KP.2 हा नवीन व्हेरिएंट गेल्या वर्षी नोव्हेंबर 2023 पासून भारतातील लोकांमध्ये दिसून आला होता. या व्हायरसला FLiRT असं नाव देण्यात आलं आहे. कोरोनाचा हा नवीन व्हेरिएंट FLiRT हा अमेरिका ब्रिटन आणि दक्षिण कोरियामधील कोरोनाच्या वाढत्या केसशी जोडला आहे. आता या कोरोनाच्या व्हेरिएंटने भारतातही पाय पसरायला सुरुवात केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून जगभरात कोरोनाची प्रकरणे स्थिर होती. मात्र आता पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅंड प्रिव्हेन्शनच्या अलीकडील अहवालानुसार कोरोनाच्या नवीन प्रकारांच्या एक नवीन संच सांडपाण्यात अलीकडेच दिसला आहे. परिणामी युनायटेज स्टेट्स आणि सिंगापूरसह अनेक देशांमध्ये या नवीन प्रकारच्या प्रकरण वेगाने वाढत आहेत. वाढणाऱ्या संसर्गामुळे सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने पुन्हा एकदा सर्व लोकांना मास्क घालण्याचे आवाहन केले आहे.
भारतातही नोंद
भारतावर सध्या JN.1 या नवीन व्हायरसचा जास्त प्रभाव दिसून येत आहे. आताची आकडेवारी पाहिली असता 679 प्रकरणे सक्रिय आहेत. कोरोनाचे नवीन प्रकार, FLiRT अधिक प्राणघातक आहे. कोरोनाचा नवीन व्हेरिएंट, FLiRT, अधिक प्राणघातक आहे कारण त्यात पूर्वीच्या कोरोना दरम्यान वापरलेल्या इम्यूनिटी बूस्टरपासून वाचण्याची क्षमता आहे. सध्या सर्व डॉक्टर यावर लक्ष ठेवून आहेत.
पुन्हा मास्क घालण्याचा सल्ला
सिंगापूरमध्ये कोविड-19 ची नवीन लाट दिसत आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, 5 ते 11 मे पर्यंत येथे 25,900 हून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. याचपार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री ओंग ये कुंग यांनी शनिवारी पुन्हा एकदा देशातील जनतेला मास्क घालण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोरोनाच्या या नवीन लाटेच्या सुरुवातीच्या टप्प्यात असून संसर्गाची प्रकरणे सतत वाढत आहेत. येत्या दोन ते चार आठवड्यांत त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. हा धोका लक्षात घेता, सर्व लोकांनी पुन्हा एकदा मास्क घालण्याची सवय लावली पाहिजे जेणेकरून संसर्गाचा प्रसार नियंत्रित करता येईल. प्रत्येकाने जून अखेरपर्यंत संसर्गाच्या या नवीन लाटेबाबत विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.