वारंवार आतड्यांमध्ये गॅस जमा होतो? मग आहारात करा 'हे' सामान्य बदल
आतड्यांमध्ये गॅस होण्याची कारणे?
पचनक्रिया कायमच निरोगी ठेवण्यासाठी काय खावे?
आतड्यांमधील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी उपाय?
हल्ली लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं ऍसिडिटी, गॅस, बद्धकोष्ठता, अपचन इत्यादी पोटासंबंधित समस्या उद्भवू लागल्या आहेत. चुकीचा आहारात, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, जंक फूडचे अतिसेवन, शारीरिक हालचालीचा अभाव, पोषक घटकांची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींमुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. आहारात सतत तेलकट, तिखट आणि अतिमसालेदार पदार्थांचे सेवन केल्यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होत नाहीत. अन्नपदार्थांचे कण आतड्यांमध्ये तसेच साचून राहतात, ज्यामुळे अपचन, गॅस आणि आतड्यांमध्ये विषारी कण तसेच साचून राहतात. आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून न गेल्यास बद्धकोष्ठता किंवा अपचनाचा त्रास होऊ शकतो. आतड्यांमध्ये गॅस जमा झाल्यानंतर ढेकर, पोटफुगी, छातीत जळजळ, पोटात गुडगुड आवाज येणे इत्यादी अनेक समस्या वाढून शरीराला हानी पोहचते.(फोटो सौजन्य – istock)
आतड्यांमध्ये वाढलेला गॅस कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या गोळ्या औषधांचे सेवन केले जाते. पण तरीसुद्धा आतड्यांमध्ये जमा झालेला गॅस कमी होत नाही. आज आम्ही तुम्हाला आतड्यांमध्ये जमा झालेला गॅस कमी करण्यासाठी आहारात कोणते बदल करावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी आहारात कायमच सहज पचन होणाऱ्या आणि शरीरासाठी आवश्यक असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोमट पाण्याचे सेवन केल्यास आतड्यांमध्ये जमा झालेला चिकट मल बाहेर पडून जातो आणि शरीर स्वच्छ होते. याशिवाय कोमट पाण्यात तुम्ही लिंबाचा रस, जिऱ्याची पावडर किंवा ओव्याची पावडर मिक्स करून पिऊ शकता. यामुळे पचनक्रिया सुधारेल आणि आतड्यांमध्ये जमा झालेला गॅस नष्ट होईल.
आहारात नेहमीच वाटीभर दही खावे. दुपारच्या जेवणात दह्याचे सेवन केल्यास खाल्लेले अननपदार्थ पचन होतील आणि आतड्यांची हालचाल सुलभ होईल. कारण यामध्ये नैसर्गिक प्रोबायोटिक आढळून येतात. ओट्स, मूगडाळ, भात, उकडलेल्या भाज्या, पपई, केळी, आवळा, नारळपाणी इत्यादी पदार्थ आतड्या आणि पोटांवर अजिबात तणाव येऊ देत नाहीत. शरीरात वाढलेला दाह कमी करण्यासाठी आल्याचे सेवन करावे. आतड्यांमध्ये घाण बाहेर काढून टाकण्यासाठी आणि शरीराच्या अंतर्गत अवयवाला आलेली सूज कमी करण्यासाठी आल्याच्या रसाचे सेवन करावे. आल्याचा रस पिऊन त्यावर कोमट पाणी प्यावे. जेवणातील पदार्थ बनवताना जिरे, ओवा, बडीशेप आणि हिंगाचा वापर करावा. हिंगाच्या वापरामुळे पचनक्रिया सुधारते. तसेच आहारात फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करावे.
दैनंदिन आहारात व्हाचे जड पदार्थ, मैद्याचे पदार्थ, फास्ट फूड, सॉफ्ट ड्रिंक्स, कोल्ड-ड्रिंक्स किंवा जास्त साखर असलेले पदार्थ खाल्ल्यास पचनक्रिया बिघडते. तसेच राजमा, छोले, काळा हरभरा, कोबी, फ्लॉवर या भाज्यांमध्ये आढळून येणाऱ्या घटकांमुळे पोटात गॅस तयार होतो. त्यामुळे आहारात पालेभाज्यांचे सेवन करावे. पालेभाज्या खाल्यामुळे शरीराला भरपूर फायदे होतात. तसेच जेवताना अन्नपदार्थ व्यवस्थित चावून खाल्ल्यास पचनाचा कोणताही त्रास होत नाही. नियमित सहज पचन होणाऱ्या हलक्या पदार्थांचे सेवन केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतात.






