West Bengal Assembly Elections 2026: ममता बॅनर्जींचा 'एक्झिट पोल'ला नकार! दोन-तृतीयांश बहुमताने तृणमूलच सत्तेत येणार
West Bengal Assembly Elections 2026 Seat Prediction: पश्चिम बंगालच्या राजकारणात 4 मे 2026 एक निर्णायक दिवस ठरणार आहे. राजकीय पक्षांचे नेते आणि सामान्य जनता दोघेही त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पश्चिम बंगालच्या दोन टप्प्यांतील मतदानानंतर ४ मे ला निकाल जाहीर होणार आहेत. या निवडणुकीच्या निकालापूर्वी एक्झिट पोलची आकडेवारीही जाहीर होत आहेत.
निवडणुकीच्या निकालांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीने, भाजपला बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळे भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे टीएमसी प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मात्र या एक्झिट पोलची आकडेवारी फेटाळून लावली असून तृणमूल काँग्रेसचे सरकार स्थापन होईल, असा दावा केला आहे.
‘द वॉल’च्या एका मीडिया रिपोर्टनुसार, टीएमसीचे दोन बालेकिल्ले मानले जाणारे, कालीघाट आणि कॅमॅक स्ट्रीट येथील एका अंतर्गत अहवालाने एका नवी चर्चा सुरू झाली आहे. या अहवालातील टीएमसीच्या विजयाचे गणितीय स्पष्टीकरण कोणालाही चकित करण्यासाठी पुरेसे आहे.
पक्षाच्या रणनीतीकारांच्या मते, जमिनीवरील परिस्थिती एक्झिट पोलच्या आकडेवारीपेक्षा लक्षणीयरीत्या वेगळी असल्याचा दावा केला आहे. ममता बॅनर्जी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मतमोजणी केंद्रांवर सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. कारण टीएमसी पुन्हा एकदा दोन-तृतीयांश बहुमताने सत्तेत परत येईल. ही लढाई आता केवळ मतांपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर विश्वासार्हता आणि दाव्यांची बनली असल्याचा विश्वास राजकीय रणनीतीकारांनी व्यक्त केला आहे.
कालीघाटजवळील सूत्रांनुसार, ‘द वॉल’ या बंगाली वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, टीएमसीने राज्यातील सर्व २९४ जागांचे सविस्तर विश्लेषण केले आहे. पक्षाच्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार अंदाजे ४३ जागा ‘ग्रे झोन’मध्ये आहेत, म्हणजेच त्यांचा निकाल अगदी थोड्या फरकाने लागू शकतो. या जागांवर कोणीही आगाऊ दावा करू शकत नाही. ममता बॅनर्जी यांचा पक्ष या ४३ जागांना ५०-५० विजयाच्या दृष्टीने पाहत आहे. याचा अर्थ, जर परिस्थिती थोडी जरी त्यांच्या बाजूने झुकली, तर टीएमसीला फायदा होऊ शकतो.
‘ग्रे झोन’मधील या जागांमध्ये काही प्रमुख उमेदवारांचाही समावेश आहे, ज्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. टीएमसीचा अंदाज आहे की, अगदी वाईट परिस्थितीतही पक्ष सहजपणे १७४ जागा जिंकेल. दरम्यान, भाजपला जास्तीत जास्त ७१ जागा मिळण्याचा अंदाज आहे. यावरून असे सूचित होते की, कालीघाटमध्ये पराभवाची भीती नसून, विजयाच्या फरकावर लक्ष केंद्रित केले जात आहे.
अभिषेक बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील कॅमॅक स्ट्रीट कॅम्पने केलेले सर्वेक्षण कालीघाटमधील सर्वेक्षणापेक्षाही अधिक उत्साहवर्धक आहे. ‘द वॉल मीडिया’च्या एका अहवालानुसार, टीएमसी २०९ ते २२९ जागा जिंकून प्रचंड विजय मिळवेल. या सर्वेक्षणात मुर्शिदाबादसारख्या मुस्लिमबहुल भागांमध्येही पक्षाच्या प्रचंड विजयाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, जिथे टीएमसीला १७ जागा मिळतील. बीरभूमसारख्या जिल्ह्यांमध्ये भाजपला एक जागा मिळेल असा अंदाज आहे.
कॅमॅक स्ट्रीटच्या रणनीतीकारांचे मते, यावेळी शांत मतदार, विशेषतः महिला, ममता बॅनर्जी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत. ‘लक्ष्मी भंडार’सारख्या योजनांचा प्रभाव मतदान यंत्रांमध्ये दिसून आला आहे. तसेच, शहरी भागांमध्येही भाजपची पकड कमकुवत झाल्याचे दिसत आहे, ज्याचा थेट फायदा टीएमसीला होऊ शकतो. हा अहवालामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा संचारली आहे.
२०२६ च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेससाठी हुगळी जिल्हा एक मोठी चिंतेची बाब होती, परंतु अंतर्गत अहवाल एक वेगळेच चित्र समोर आणत आहेत. अहवालानुसार, हुगळीमधील १८ पैकी १५ जागांवर टीएमसी जिंकणार असल्याचा दावा करण्यात आल आहे. विशेष म्हणजे, पक्षाने १० जागांवर विद्यमान आमदारांना तिकीट न देता नव्या चेहऱ्यांवर विश्वास व्यक्त केला आहे. सत्ताविरोधी लाटेला तोंड देण्यासाठी केलेला हा प्रयोग पूर्णपणे यशस्वी झाल्याचेही बोलले जात आहे.
राजकीय तज्ज्ञांचा असा विश्वास होता की, भाजप हुगळीमध्ये आपले स्थान निर्माण करू शकेल, परंतु कॅमॅक स्ट्रीटच्या अहवालाने या अटकळांना पूर्णविराम दिला आहे. जर हुगळीमधील निकाल या अंतर्गत सर्वेक्षणाशी जुळले, तर हे सिद्ध होईल की ममता बॅनर्जी यांची संघटनात्मक पकड २०२१ इतकीच आजही मजबूत आहे. हा जिल्हा सत्तेची गुरुकिल्ली ठरू शकतो.
कोलकाता आणि दक्षिण २४ परगणा हे नेहमीच तृणमूलचे बालेकिल्ले राहिले आहेत आणि यावेळीही त्यात कोणताही बदल झालेला दिसत नाही. पक्षाच्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार, कोलकातामधील ११ पैकी १० जागांवर टीएमसीचा विजय होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, दक्षिण २४ परगणामधील ३१ पैकी ३० जागा तृणमूल काँग्रेसला मिळत आहेत. येथे भाजपला पाय रोवणे अशक्य वाटत आहे.
हावडा जिल्ह्यातही १६-० असा निकाल लागण्याचा अंदाज आहे. याचा अर्थ संपूर्ण शहरी आणि निमशहरी पट्ट्यात ममता बॅनर्जींची लाट कायम आहे. जर हे आकडे खरे ठरले, तर भाजपचा २०० जागांचा टप्पा ओलांडण्याचा नारा केवळ एक स्वप्नच राहील. टीएमसीला त्यांची मतपेढी सुरक्षित आहे आणि तिला कोणताही धक्का लागलेला नाही. असा विश्वास पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे.
मुर्शिदाबाद आणि मालदा सारखे जिल्हे, जे एके काळी काँग्रेस आणि डाव्या पक्षांचे बालेकिल्ले होते, ते आता टीएमसीच्या पूर्ण नियंत्रणाखाली असल्याचे दिसत आहे. वृत्तानुसार, तृणमूल काँग्रेसला मुर्शिदाबादमधील सर्व १७ जागा जिंकण्याची अपेक्षा आहे. भाजपचे ध्रुवीकरणाचे कार्ड येथे चालत असल्याचे दिसत नाही. ‘द वॉल’च्या वृत्तानुसार, अल्पसंख्याक मतांच्या विभाजनाचा टीएमसीला थेट फायदा झाला आहे.






