थंडीत लहान मुलांच्या नाश्त्यासाठी बनवा नाचणीचे हॉट चॉकलेट!
राज्यासह संपूर्ण देशभरात थंडीचे वारे वाहू लागले आहेत. थंडगार वातावरणात शरीराला उष्णतेची आवश्यकता असते. कारण वातावरणात निर्माण झालेल्या गारव्याचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये कायमच उष्ण पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. आहारात शरीरास सहज पचन होतील अशाच पदार्थांचे सेवन करावे. लहान मुलांना सकाळच्या नाश्त्यात कायमच बिस्कीट किंवा ब्रेड बटर खाण्यास दिले जाते. पण वारंवार मैदा वापरून बनवलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास शरीराची पचनक्रिया बिघडते आणि लहान मुलांना पचनाच्या समस्या उद्भवतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लहान मुलांच्या नाश्त्यासाठी नाचणीचे हॉट चॉकलेट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. नाचणी आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. नाचणीच्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. यामध्ये असलेल्या गुणकारी घटकांमुळे शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून निघते. बाजारात उपलब्ध असलेल्या चॉकलेटमध्ये कायमच साखर आणि हानिकारक रसायनांचा वापर केला जातो. त्यामुळे सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवलेल्या नाचणी हॉट चॉकलेटचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)






