पुरूषांमध्ये वाढतोय कर्करोगाचा धोका (फोटो सौजन्य - iStock)
भारतात पुरुषांमध्ये मूत्रमार्गाच्या कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून ही एक चिंताजनक बाब ठरत आहे. प्रोस्टेट, मूत्राशय, मूत्रपिंड आणि टेस्टिक्युलर कर्करोगांसह मूत्रमार्गाच्या कर्करोगाचे प्रमाण सध्या वाढत असल्याचे दिसून येते. यावर वेळीच उपचार व निदान गरजेचे आहे असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील मूत्र विकार तज्ज्ञ डॉ. पवन रहांदळे म्हणाले की, मूत्रमार्गाच्या कर्करोगामुळे पुरुषांच्या प्रजनन प्रणालीच्या काही भागांसह मूत्र तयार करणाऱ्या आणि उत्सर्जित करणाऱ्या अवयवांवर दुष्परिणाम होतो. कर्करोगाचा सर्वात सामान्य प्रकार म्हणजे प्रोस्टेट कॅन्सर, जो ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांमध्ये आढळून येतो , मूत्राशयाच्या कर्करोगात मूत्रावाटे रक्तस्राव आढळून येते (फोटो सौजन्य – iStock)
लक्षणे ओळखण्यास उशीर
मूत्रपिंडाचा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात चटकन लक्षात येत नाही आणि अंडकेषाचा(टेस्टिक्युलर) कर्करोग हा तरुण वयोगटातील पुरुषांमध्ये सामान्यपणे आढळून येतो. मूत्राशय, मूत्रपिंड आणि अंडकोषाचा (टेस्टिक्युलर) कॅन्सर हा ३० ते ६५ वयोगटातील पुरुषांमध्ये दिसून येतो. शिवाय, या प्रत्येक कर्करोगाचे स्वरूप वेगवेगळे असते, परंतु वेळीच निदान झाल्यास त्यावर मात करता येते.
दुर्देवाने अनेक रुग्णांमध्ये आढळणारी लक्षणे ही किरकोळ किंवा वयाशी संबंधित आहेत असे समजून निदानास उशीर होतो. १० कर्करुग्णांपैकी ४ रुग्णांमध्ये सुरुवातीची लक्षणे दिसली परंतु वैद्यकीय मदत घेण्यास उशीर झाला ज्यामुळे त्यांचा रोग प्रगत अवस्थेत गेला. २ जणांना प्रोस्टेट कॅन्सर, १ व्यक्तीला मूत्राशयाचा कर्करोग आणि १ व्यक्तीला मूत्रपिंडाचा कर्करोगाचे निदान झाले.
काय आहे लक्षणे
लघवीवाटे रक्त येणे, वारंवार लघवीची इच्छा होणे किंवा लघवी करताना त्रास होणे, पाठीच्या खालच्या भागात किंवा ओटीपोटात अस्पष्ट वेदना किंवा टेस्टिक्युलर आकारात बदल यासारख्या लक्षणं आढळून येतात. एकदा कर्करोगाचे निदान झाले की उपचार हे कर्करोगाच्या प्रकारावर आधारित असतात. डॉक्टर तुमच्यासाठी उपचारांची अचूक योजना आखतील.
कर्करोगाचे वाढते प्रमाण
पुरुषांमध्ये मूत्रमार्गाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. अनेकांना प्रोस्टेट, मूत्राशय, मूत्रपिंड आणि अंडकोषाच्या कर्करोगांचे निदान होत असून त्यांनी उपचारांना उशीर करू नये. मोठ्या संख्येने पुरुष रुग्ण लघवीला त्रास होणे किंवा मूत्रावाटे रक्त येणे याकडे दुर्लक्ष करतात, कारण ते त्यांना ते किरकोळ संसर्गाचे लक्षण वाटते. परंतु ही गंभीर आजाराची सुरुवातीला लक्षणे असू शकतात.
गेल्या ३-४ महिन्यांत, ५ पैकी ३ पुरुषांना प्रोस्टेट कर्करोग आणि २ पुरुषांना मूत्राशय कर्करोगाचे निदान झाले आहे. ५० वर्षांनंतर नियमित तपासणी करणे, विशेषतः कौटुंबिक इतिहास किंवा विद्यमान मूत्रमार्गाच्या समस्या असलेल्या व्यक्तींनी ही तपासणी करणे अतिशय गरजेचे आहे.
प्रोस्टेट कर्करोग म्हणजे काय आणि कशी करावी तपासणी? प्रत्येक पुरूषाला माहीत असायलाच हवे
कोणत्या वयात होतो पुरुषांना कॅन्सर
प्रोस्टेट कर्करोग ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांना होतो आणि त्याचे निदान पीएसए चाचण्या आणि बायोप्सीद्वारे केले जाते. ३० ते ६५ वयोगटातील पुरुषांमध्ये मूत्राशय, मूत्रपिंड आणि अंडकोषाचा कर्करोग आढळून येतो. मूत्राशय कर्करोगात मूत्रावाटे रक्तस्राव होणे तसेच सिस्टोस्कोपी आणि इमेजिंगद्वारे त्याची निदान केले जाते. मूत्रपिंडाचा कर्करोग बहुतेकदा सुरुवातीला दिसून येत नाही आणि त्याचा शोध घेण्यासाठी स्कॅनची आवश्यकता भासते, तर तरुण पुरुषांमध्ये अंडकोषाचा कर्करोग हा अल्ट्रासाऊंड आणि ब्लड मार्करद्वारे शोधला जाऊ शकतो.
कर्करोगाच्या टप्प्यानुसार शस्त्रक्रिया, रेडिएशन किंवा केमोथेरपीसारखे उपचार ठरविले जातात. वेळीच निदान केल्यास कर्करोगावर मात करता येऊ शकते, कर्करोग पसरण्यापूर्वी त्यावर उपचार करणे शक्य होते. जागरूकता आणि वेळोवेळी वैद्यकिय तपासणी एखाद्याचा अमूल्य जीव वाचवू शकते, अशी प्रतिक्रिया तळेगाव येथील टीजीएच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरचे सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. प्रशांत चंद्र यांनी व्यक्त केली.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.