पावसाळ्यात केवळ पाणी पिणे पुरेसे का नसते? शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी इलेक्ट्रोलाइट्सही महत्त्वाचे, जाणून घ्या सविस्तर
पावसाळ्यात शरीरातून पाणी आणि सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांसारखे आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स नकळत कमी होत असतात. मात्र, या काळात आपल्याला उन्हाळ्याच्या तुलनेत फारसा घाम येत नसल्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता किंवा आर्द्रतेचा (Humidity) परिणाम आपल्या लक्षात येत नाही.याबद्दल डॉ. दिव्या गोपाळ, ऍडिशनल डायरेक्टर, इंटरनल मेडिसिन, Sir H.N. Reliance Foundation Hospital यांनी सविस्तर माहिती सांगितली आहे.(फोटो सौजन्य – AI)
शरीरातील द्रवपातळी संतुलित ठेवण्यासोबतच स्नायू आणि मज्जासंस्थेचे योग्य कार्य सुरळीत ठेवण्यासाठी इलेक्ट्रोलाइट्सची महत्त्वाची भूमिका असते. पावसाळ्यात तहान कमी जाणवत असल्याने शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याचे अनेकदा लक्षात येत नाही. अशा परिस्थितीत केवळ पाणी प्यायल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता भरून निघत नाही. त्यामुळे थकवा, स्नायूंमध्ये आकडी येणे, डोकेदुखी, चक्कर येणे आणि तहान लागणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
त्यामुळे अधिक उष्णता किंवा जास्त घाम येत असताना शरीराचे योग्य हायड्रेशन राखण्यासाठी केवळ पाणी पुरेसे ठरणार नाही. पाण्यासोबत इलेक्ट्रोलाइट्सचे सेवन करणेही आवश्यक ठरू शकते. यासाठी ओआरएस (ORS), थोडे मीठ घातलेले लिंबूपाणी, नारळपाणी, ताक आणि संतुलित आहार यांचा आहारात समावेश करता येतो.
शरीराला केवळ पाण्याऐवजी इलेक्ट्रोलाइट्सची आवश्यकता असते, तेव्हा शरीर काही स्पष्ट संकेत देत असते. भरपूर पाणी प्यायल्यानंतरही सतत तहान लागणे हे त्यापैकी एक प्रमुख लक्षण आहे. शरीरात द्रवपातळीचे संतुलन राखण्यासाठी सोडियम आणि पोटॅशियम यांसारख्या इलेक्ट्रोलाइट्सचीही गरज असते. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायल्यानंतरही तहान, पोट फुगल्यासारखे वाटणे किंवा पोट भरल्याची भावना कायम राहू शकते.
इलेक्ट्रोलाइट्सच्या कमतरतेचे आणखी एक लक्षण म्हणजे स्नायूंमध्ये आकडी येणे, स्नायू आकसणे किंवा स्नायूंमध्ये अनैच्छिक हालचाल होणे. ही समस्या प्रामुख्याने पोटरी, पाय आणि पोटाच्या भागातील स्नायूंमध्ये जाणवू शकते. स्नायूंचे कार्य सुरळीत ठेवण्यात इलेक्ट्रोलाइट्स महत्त्वाची भूमिका बजावत असल्यामुळे त्यांची कमतरता झाल्यास अशा समस्या उद्भवू शकतात.
उष्णतेमुळे होणारी डोकेदुखी, थकवा, चक्कर येणे आणि अशक्तपणा हीदेखील घामाद्वारे शरीरातील आवश्यक खनिजे मोठ्या प्रमाणात कमी झाल्याची लक्षणे असू शकतात. यासोबतच विचार करण्यास अडचण येणे (Brain Fog), चिडचिड, सुस्ती किंवा एकाग्रता कमी होणे यांसारखी लक्षणेही इलेक्ट्रोलाइट्सच्या कमतरतेमुळे मज्जासंस्थेवर परिणाम होत असल्याचे संकेत देऊ शकतात.
चिप्स, लोणचे यांसारखे खारट पदार्थ खाण्याची अचानक इच्छा होणे, हे शरीरातील सोडियमची कमतरता भरून काढण्यासाठी शरीराकडून दिले जाणारे संकेत असू शकतात. तसेच, थकवा किंवा चक्कर येत असतानाही लघवीचा रंग पूर्णपणे स्वच्छ किंवा अगदी फिकट असणे, हे इलेक्ट्रोलाइट्सची भरपाई न करता शरीरात अतिरिक्त पाणी गेले असल्याचे किंवा अतिप्रमाणात पाणी प्यायल्याचे संकेत असू शकतात.
पावसाळ्यात शरीराचे योग्य हायड्रेशन राखण्यासाठी पौष्टिक आहारासोबत पुरेशा प्रमाणात द्रवपदार्थ आणि इलेक्ट्रोलाइट्स घेणे महत्त्वाचे आहे. यासाठी ओआरएस, नारळपाणी, ताक किंवा थोडे मीठ घातलेले लिंबूपाणी यांचा समावेश करता येतो. मात्र, या काळात सर्वात महत्त्वाचे म्हणजे शरीरातील हायड्रेशनची पातळी योग्य आहे की नाही, याकडे नियमितपणे लक्ष देणे.






