Maharashtra Breaking News Updates Today
देशभरात सध्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ची (Cockroach Janta Party) सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. सुरुवातीला लोकांनी याला निव्वळ एक गंमत समजले होते, पण काही दिवसांतच हा विषय सोशल मीडियावर तुफान ट्रेंड होऊ लागला आहे.
गेल्या १५ मे रोजी स्थापन झालेल्या या कॉकरोच जनता पार्टीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अक्षरशः धुमाकूळ माजवला आहे. अवघ्या आठ दिवसांच्या अल्प कालावधीत या पार्टीने तब्बल १ कोटी १८ लाख ७० हजार फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे. सोशल मीडियाच्या इतिहासात इतक्या कमी वेळात एखाद्या चळवळीने किंवा पेजने एवढ्या मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स मिळवण्याचा हा आतापर्यंतचा सर्वोच्च आणि ऐतिहासिक आकडा ठरला आहे.
22 May 2026 04:50 PM (IST)
टिटवाळा येथील बल्यांनी आणि मांडा परिसरात शासनाच्याजागेवर चाळमाफिया चाळी तयार करतात .स्वस्त घराच्या आमिषाने लोक घर घेतात आणि फसतात.महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मिलीभगतने चाळ माफिया आधी घरे तयार करतात लोकांना विकतात .आता या चाळींवर केडीएमसीने तोडक कारवाई सुरू केली आहे .शेकडोच्या संख्येने लोक बेघर झाले आहे. या सर्व प्रकाराला जबाबदार असणाऱ्या केडीएमसी अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
22 May 2026 04:45 PM (IST)
उल्हासनगर कॅम्प ५ मधील कैलाश कॉलनी परिसरात झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात उल्हासनगर गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले असून आरोपी शेखर बिराजदार आणि अजय राव यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.उल्हासनगर गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार राजेंद्र उर्फ पिंट्या थोरवे यांना माहिती मिळाली होती की हत्ये प्रकरणातील काही आरोपी वांगणी येथे येणार आहेत. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक पवार तसेच पोलीस अंमलदार पिंट्या थोरवे, गणेश गावडे, रितेश वंजारी, योगेश वाघ, प्रसाद तोंडलीकर, रामदास उगले, शेखर भावेकर आणि बाबू जाधव यांच्या पथकाने सापळा रचला. सकाळी सातच्या सुमारास शेखर बिराजदार आणि अजय राव यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, कॅम्प पाचमधील कैलास कॉलनी चौकात सायंकाळी साडेसातच्या सुमारास १५ ते १६ जणांच्या टोळक्याने हातात शस्त्रे घेऊन हल्ला केला होता. या गोळीबारात सख्खे भाऊ अनिल हरकेश चौहान आणि अमन हरकेश चौहान यांचा मृत्यू झाला, तर अर्जुन सुरजबली चौहान गंभीर जखमी झाला आहे.
22 May 2026 04:40 PM (IST)
अहिल्यानगरच्या पाथर्डी शहरात गेल्या अनेक दिवसांपासून केमिकल पद्धतीने पिकवलेले आंबे आणि केळी मोठ्या प्रमाणावर विकली जात असल्याची चर्चा सुरू होती. नागरिकांच्या आरोग्याशी होणारा हा खेळ थांबवण्यासाठी अखेर प्रशासनाने सकाळी पोलीस बंदोबस्तात मोठी कारवाई केली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे आणि उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सचिन दरंदले यांच्या संयुक्त पथकाने पाथर्डी शहरातील घाऊक आणि किरकोळ फळ विक्रेत्यांच्या वखारींवर आणि दुकानांवर अचानक छापे टाकले. या धडक कारवाईमुळे फळ बाजारात एकच खळबळ उडाली असून, अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सोडून पळ काढला, तर काहींनी केमिकलने पिकवलेल्या आंब्यांचे कॅरेट लपवण्याचा प्रयत्न केला.
22 May 2026 04:35 PM (IST)
सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा कडक उन्हाळा जाणवत असल्याने जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये जिल्ह्यातील ३२५ वाड्यांचा समावेश आहे. यानुसार, विहीरीतील गाळ उपसा, विहिरींची डागडुजी, नळपाणी योजना दुरुस्ती, विंधन विहिरी विशेष दुरुस्ती या उपाययोजनाना मंजुरी देण्यात आली आहे. त्यातील १८५ कामांना मंजुरी मिळाली असून सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाणीटंचाईबाबत तक्रारी नसल्याची माहिती जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता सुजित राणे यांनी दिली.
22 May 2026 04:30 PM (IST)
मनपाच्या सुरक्षा दाव्यांची पोलखोल, ठेकेदाराच्या निष्काळजीपणावर प्रशासन मौन भिवंडी महानगरपालिकेकडून पावसाळ्यापूर्वी नाला सफाई मोहीम युद्धपातळीवर सुरू असल्याचे दावे केले जात असतानाच, मजुरांच्या सुरक्षेबाबतची गंभीर निष्काळजीपणा समोर आला आहे. प्रभाग समिती क्रमांक-२ अंतर्गत वॉर्ड क्रमांक १४ मधील पिराणी पाडा येथे नाला सफाईदरम्यान विषारी वायूचा श्वास घेतल्याने एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे मनपा प्रशासन आणि संबंधित ठेकेदारांच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
22 May 2026 04:25 PM (IST)
शेवगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सालवडगाव शिवारामध्ये मशीनच्या साहाय्याने अवैधरित्या सुरू असलेल्या मावा तयार करण्याच्या कारखान्यावर शेवगाव पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या छाप्यात पोलिसांनी तब्बल 31 लाख 38 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, दोन आरोपींना रंगेहात ताब्यात घेतले आहे. या धडक कारवाईमुळे शेवगाव परिसरात अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून प्रचंड खळबळ उडाली आहे.अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्ये नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना सालवडगाव शिवारात कच्च्या आणि पक्क्या सुपारीमध्ये सुगंधी तंबाखू मिसळून मोठ्या प्रमाणावर मावा तयार केला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
22 May 2026 04:20 PM (IST)
भाईंदर पूर्वेतील इंद्रलोक फेस-४ परिसरातील “सदानंद बिअर शॉप” येथे सोमवारी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास मोठा गोंधळ निर्माण झाल्याची घटना समोर आली. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असून माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित बिअर शॉपमुळे परिसरातील रहिवाशांना अनेक दिवसांपासून त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः महिलांना आणि कुटुंबीयांना रात्री उशिरापर्यंत होणारा गोंधळ, मद्यधुंद व्यक्तींचा वावर आणि आरडाओरड यामुळे मानसिक त्रास होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
22 May 2026 04:15 PM (IST)
खादगाव येथील एका शेतकरी कुटुंबाला आपल्या हक्काच्या शेतरस्त्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. वारंवार दाद मागूनही आणि प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळत असल्याने संतप्त झालेल्या पादीर कुटुंबाने आजपासून सामाजिक कार्यकर्ते प्रकाश मोहन पोटे यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. "जोपर्यंत शेतरस्त्याचा प्रश्न प्रत्यक्ष सुटत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही," असा आक्रमक पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे तहसील कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.शासनाकडून शेतकऱ्यांना लवकरच कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.
22 May 2026 04:15 PM (IST)
सिवुड्स वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहिनी लोखंडे आणि त्यांच्या पथकाच्या सतर्कतेमुळे पहाटेच्या अपघातानंतर एक गंभीर प्रकरण उघडकीस आले. अक्षर सिग्नल येथे झालेल्या अपघातग्रस्त कारमधून मोठ्या प्रमाणात अफू, पिस्तूल आणि संशयित केमिकल जप्त करण्यात आल्याने नवी मुंबईत खळबळ उडाली आहे.माहितीनुसार, पहाटे अक्षर सिग्नल येथे एका पांढऱ्या रंगाच्या MG हेक्टर कारचा अपघात झाल्याची माहिती रात्रगस्तीवरील पथकाला मिळाली. घटनास्थळी पोहोचल्यावर संबंधित कार डिव्हायडरला धडकलेल्या अवस्थेत आढळून आली. अपघातानंतर कारमधील व्यक्ती वाहन घटनास्थळी सोडून पसार झाल्या होत्या. संशय आल्याने पोलिसांनी वाहनाची सखोल तपासणी केली असता धक्कादायक बाब समोर आली.
22 May 2026 04:10 PM (IST)
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुरेसा पेट्रोल आणि डिझेल साठा असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जिल्ह्यात ६० शासकीय कंपन्यांचे पंप तर ६ खाजगी कंपन्यांचे पंप आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५ लाख लीटर पेट्रोल आणि ४.५० लाख लिटर डिझेल असा पुरेसा साठा असल्याची माहिती
सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी एम. ए. फटाले यांनी दिली.
22 May 2026 03:55 PM (IST)
आयपीएल २०२६ मध्ये आज गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात हायव्होटेज सामना रंगणार आहे. हैदराबाद येथील राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर हा महत्वाचा सामना खेळला जाणार आहे. हा सामना साखळी फेरीतील ६७ वा सामना आहे. प्लेऑफच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. आरसीबी आणि एसआरएच दोन्हीही संघानी प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. परंतु, टॉप-२ मध्ये स्थान मिळवण्यासाठी आज दोन्ही संघ पूर्ण ताकदीने मैदानात उतरतील. या सामन्यात कशी असेल खेळपट्टी अन संभाव्य प्लेइंग ११, जाणून घ्या.
22 May 2026 03:50 PM (IST)
PM Modi Cyprus President Meeting 2026 : भारत आणि युरोपीय देशांमधील राजनैतिक आणि आर्थिक संबंधांना आता एक नवीन आणि मजबूत दिशा मिळाली आहे. नवी दिल्लीतील ऐतिहासिक हैदराबाद हाऊस येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) आणि सायप्रस प्रजासत्ताकाचे अध्यक्ष निकोस ख्रिस्तोदौलिदेस यांच्यात अत्यंत महत्त्वाची शिष्टमंडळ स्तरावर चर्चा पार पडली. हा दौरा दोन्ही देशांमधील द्विपक्षीय भागीदारी अधिक घट्ट करण्यासाठी मैलाचा दगड ठरत आहे. या बैठकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही देशांनी मिळून घेतलेले ते निर्णय, ज्यांचा थेट फायदा भारतातील लाखो विद्यार्थी, तंत्रज्ञ आणि तरुण नोकरदारांना होणार आहे. वाचा सविस्तर
22 May 2026 03:45 PM (IST)
होर्मुझ सामुद्रधुनीच्या सुरक्षेसाठी ब्रिटनच्या नेतृत्त्वाखाली एक मोहिम राबवली जाणार आहे. या मोहिमेला जर्मनीने पाठिंबा दिला असून जर्मनीचे परराष्ट्र मंत्री योहान वेडेफुल यांनी यामध्ये सहभागी होण्याची घोषणा केली आहे. युरोपीय राष्ट्रांनी बजावलेल्या स्वतंत्र सुरक्षा भूमिकेचे प्रतीक म्हणून याकडे पाहिले जात आहे.
22 May 2026 03:40 PM (IST)
Childline 1098 आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या संयुक्त प्रयत्नांतून बुलढाणा जिल्ह्यात मागील एका महिन्यात तब्बल २४ बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. महिला व बाल विकास विभागांतर्गत ही मोहीम राबविण्यात आली असून विविध शासकीय यंत्रणांच्या समन्वयातून बालविवाह प्रतिबंधासाठी प्रभावी कारवाई करण्यात आली. जिल्ह्यात बालविवाहाच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अॅक्शन मोडमध्ये काम करत तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. वाचा सविस्तर
22 May 2026 03:35 PM (IST)
पश्चिम रेल्वेकडून १९ मे ते २३ मे बांद्रा पूर्व परिसरात विशेष मोहिम राबवण्यात आली. यामध्ये ४०० ते ५०० बेकायदेशीर बांधकामे हटवण्यात आली आहेत. सुमारे ६०० कोटी किमतीची ५,२०० चौरस मीटर जागा मोकळी करण्यात आली आहे. यावर नवीन प्लॅटफॉर्म, अतिरिक्त रेल्वेमार्ग आणि कनेक्टिव्ही सुधारणा केल जाणार आहे. ज्यामुळे रेल्वे गर्दी कमी होण्यास मदत होईल.दरम्यान एका मंदीराची तोडफोड करण्यात आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. यावेळी आंदोलकांनी अधिकाऱ्यांवर दगडफेक केली. ज्यात काही अधिकारी जखमी झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठी चार्ज केला. सध्या १०-१६ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
22 May 2026 03:30 PM (IST)
भारतीय रेल्वेने जानेवारी २०२६ मध्ये पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरु केली आहे. ही ट्रेन कोलकाता ते गुवाहाटी दरम्यान ९६८ किमी लांबीचा हावडा-कामाख्या मार्गावर धावते. केवळ १४ तासात प्रवास पूर्ण होत. या ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी आरामदायी बेड, मोबाईल चार्जिंग पोर्ट, वाचनासाठी स्वतंत्र लाईट्स, सुरक्षेसाठी कवचअँटी-कोलिजन तंत्रज्ञान उपलब्ध करण्यात आले आहे. या ट्रेनमध्ये एकूण ८२३ प्रवाशांची क्षमता आहे. सध्या या आरामादायी प्रवासामुळे वंदे भारत स्मीपर ट्रेनला प्रचंड पसंतील मिळत आहे.
22 May 2026 03:25 PM (IST)
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून संभाजीनगरची ओळख शिवसैनिकांच्या परिश्रमातून झालेली आहे. पक्षप्रमुख एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) यांच्या आदेशानुसार गट तटाचे राजकारण न करता नेत्यांनी मनभेद बाजूला सारुन पक्षवाढीच्या कामात योगदान देणे गरजेचे आहे. तिन्ही मतदारसंघात संघटनाबांधणीचे काम झालेले आहे ते समाधानकारक नसून हा आत्मचिंतनाचा विषय आहे. जिथे ताकद नाही तिथेही शिवसैनिकांनी मोठे काम केल्याचा अभिमान आहे. माञ व्यासपीठावरील नेत्यांनी कार्यकर्ता प्रमाणे काम करण्याची गरज असल्याचे सांगत नेत्यांचे कान टोचण्याचे काम उद्योगमंत्री उदय सामंत यांनी संभाजीनगरातील मेळाव्यात केले. वाचा सविस्तर
22 May 2026 03:20 PM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथे सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्टोडौलाईड्स यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली आहे. या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री हे देखील उपस्थित होते.
#WATCH | Prime Minister Narendra Modi holds delegative level talks with the President of the Republic of Cyprus, Nikos Christodoulides, in Delhi.
EAM Dr S Jaishankar, NSA Ajit Doval, and Foreign Secretary Vikram Misri, were also present at the meeting.
(Source: DD) pic.twitter.com/PGi9VPRAiq
— ANI (@ANI) May 22, 2026
22 May 2026 03:15 PM (IST)
महाराष्ट्रात तापमानाचा पार ४५ अंशाच्या वर गेला आहे. विदर्भात दोन दिवसांचा उष्णतेचा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असताना आता हवामान खात्याने एल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या संभाव्य संकटाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. वाचा सविस्तर
22 May 2026 03:10 PM (IST)
‘ईडी’ (ED) आणि मुंबई पोलिसांच्या चौकशीची भीती दाखवून शहरातील एका ८४ वर्षीय निवृत्त प्राध्यापकाची ३२ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य सायबर टोळीचा बेगमपुरा पोलिसांनी अखेर पर्दाफाश केला आहे. नऊ महिन्यांच्या अथक आणि तांत्रिक तपासानंतर पोलिसांनी गुजरातमधील जुनागढ येथून दोन मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या सायबर फसवणूक रॅकेटमधील तिसरा आरोपी अद्याप फरार असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. राजेशकुमार कांजीभाई वडालिया (वय ५२) आणि कनुभाई पुनाभाई चोटानी (वय ४५, दोघे रा. जुनागढ, गुजरात) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर दिपेनकुमार गिरीशभाई टिलवा हा तिसरा आरोपी अद्याप फरार आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त सागर देशमुख यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत या मोठ्या कारवाईची माहिती दिली. वाचा सविस्तर
22 May 2026 03:05 PM (IST)
भारतात सोशल मीडियावर कॉकरोज जनता पार्टी या नव्या राजकीय पक्षाची जोरदार चर्चा सुरु आहे. भारतीय तरुणांनी तयार केलेला हा ग्रुप सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. आता या पार्टीची क्रेझ पाकिस्तानातही पोहोचली आहे. तेथील तरुणांमध्येही प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहेत. मात्र, पाकिस्तानने भारतीयांची नक्कल करत एक मोठी चूक केली आहे. ज्यामुळे त्यांची जगभरात थट्टा उडवली जात आहे. वाचा सविस्तर
22 May 2026 02:59 PM (IST)
शेजारील देश पाकिस्तान (Pakistan News) सध्या एकाच वेळी आर्थिक दिवाळखोरी आणि राजकीय अराजकतेच्या गर्तेत सापडला आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यानंतर आता आणखी एका बड्या नेत्याने थेट पाकिस्तानी लष्कर आणि तिथली गुप्तहेर संघटना ‘ISI’ विरोधात बंड पुकारले आहे. जमियत उलेमा-ए-इस्लाम-फझलचे (JUI-F) सर्वेसर्वा मौलाना फजलुर रहमान यांनी कराचीमधील एका प्रचंड जनसभेला संबोधित करताना थेट पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर यांच्या सत्तेला हादरा दिला आहे. “जर उद्या मला ठार मारले गेले, तर त्याला सध्याचे प्रशासन आणि लष्करी यंत्रणाच जबाबदार असेल,” असा उघड इशारा देत मौलानांनी छाती बडवून थेट व्यवस्थेला ललकारले आहे. त्यांच्या या विधानामुळे संपूर्ण पाकिस्तानात खळबळ उडाली आहे.
22 May 2026 02:52 PM (IST)
गुजरात टायटन्सकडून झालेल्या लाजिरवाण्या पराभवामुळे चेन्नई सुपर किंग्स आयपीएल २०२६ च्या प्लेऑफच्या शर्यतीतून अधिकृतपणे बाहेर पडली आहे. या पराभवातून संपूर्ण संघ सावरण्याआधी त्यांना चेन्नईला आणखी एक धक्का बसला आहे. गुजरातविरुद्धच्या सामन्यानंतर, बीसीसीआयने कठोर कारवाई करत चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधारासह संपूर्ण संघाला २४ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या सामन्यात संघाने स्लो ओव्हर रेटचा नियम मोडल्यामुळे ही शिक्षा देण्यात आली.
22 May 2026 02:40 PM (IST)
जागतिक राजकारणात आणि ऊर्जा क्षेत्रात सध्या मोठी खळबळबळ उडाली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांच्या आगामी भारत दौऱ्यापूर्वी त्यांनी केलेल्या एका दाव्याने आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीच्या वर्तुळात नवा वाद पेटवला आहे. अमेरिका भारताला हवी तेवढी ऊर्जा आणि तेल पुरवण्यास तयार असल्याचे सांगतानाच, रुबियो यांनी व्हेनेझुएलाच्या (Venezuela) हंगामी राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्ज पुढील आठवड्यात भारत दौऱ्यावर येत असल्याचा मोठा खुलासा केला. विशेष म्हणजे, भारत किंवा व्हेनेझुएला या दोन्ही देशांनी या दौऱ्याची कोणतीही अधिकृत घोषणा केली नव्हती. अमेरिकेने भारताच्या परराष्ट्र धोरणा संदर्भातील गुप्त माहिती आधीच उघड केल्यामुळे भारतातील विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.
22 May 2026 02:31 PM (IST)
पुण्यातील फुरसुंगी-उरूळी येथील कचरा डेपोचा प्रश्न पुन्हा पेटला आहे स्थानिकांनी कचऱ्याच्या गाड्या अडवून आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत ओपन डंपिंग बंद होत नाही तो पर्यंत कचऱ्याच्या गाड्या जाऊन देणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे
22 May 2026 02:19 PM (IST)
दिल्ली दंगलीच्या कटातील आरोपी उमर खालिदला जामीन मंजूर केला आहे. उमरने आपल्या दिवंगत काकांच्या चेहलुमला (वाढदिवसाला) उपस्थित राहण्यासाठी आणि शस्त्रक्रियेदरम्यान आजारी आईची काळजी घेण्यासाठी अंतरिम जामिनाची मागणी केली होती.
22 May 2026 02:10 PM (IST)
नीट पेपर फुटी प्रकरणात चौकशीसाठी सीबीआयचे पथक लातूरमध्ये तळ ठोकून आहे, गुरुवारी दोन डॉक्टरांची लातूरमध्ये चौकशी करण्यात आली, आज एका नवीन तिसऱ्या डॉक्टरची सीबीआयच्या पथकाकडून चौकशी सुरू आहे, लातूरच्या जुना औसा रोड भागात डॉक्टरच्या हॉस्पिटलमध्ये सीबीआयच्या पथकाकडून कसून चौकशी सुरू आहे.
22 May 2026 02:00 PM (IST)
जागतिक राजकारणातून आणि विशेषतः मध्य-पूर्वेतून (Middle-East) एक अत्यंत खळबळजनक आणि चिंताजनक बातमी समोर येत आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील (US-Israel Iran War) अणु कराराचा आणि युद्धाचा तणाव आता एका अत्यंत धोकादायक वळणावर पोहोचला आहे. पाकिस्तानच्या मध्यस्थीने दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या तात्पुरत्या युद्धविरामानंतरही पडद्यामागे अविश्वासाची दरी कमालीची वाढली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला मोजतबा खामेनी यांनी एक अत्यंत कठोर आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यांनी अण्वस्त्रांसाठी आणि लष्करी वापरासाठी उपयुक्त ठरू शकणारे आपले उच्च संवर्धित युरेनियम (Highly Enriched Uranium) देशाबाहेर निर्यात करण्यास साफ नकार दिला आहे. इराणच्या या आक्रमक पवित्र्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू कमालीचे संतप्त झाले आहेत.
22 May 2026 01:50 PM (IST)
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य जनतेवर पडणारा आर्थिक भार, वाढती महागाई आणि केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या वतीने शुक्रवार (२२ मे 2026) सकाळी १० वाजता उंब्रज येथील पेट्रोल पंपावर जोरदार आंदोलन करण्यात आले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशिला पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
22 May 2026 01:40 PM (IST)
एसटी महामंडळासाठी भाडेतत्त्वावर इलेक्ट्रिक बस पुरविणाऱ्या कंत्राटदार कंपनीला शासनाने दिलेली वाढीव मुदत आज संपुष्टात आली. मात्र, ठरवून दिलेले १,२८८ बस पुरवठ्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात कंपनी अपयशी ठरल्याने सरकारने हे कंत्राट तत्काळ रद्द करावे, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.
भाडेतत्त्वावरील ५,१५० इलेक्ट्रिक बस घेण्याच्या प्रकल्पाचे उद्घाटन १३ फेब्रुवारी २०२४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते. करारानुसार दरमहा २१५ बसेस एसटीला उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात बस पुरवठा अत्यंत संथ गतीने झाल्याचा आरोप बरगे यांनी केला.
22 May 2026 01:30 PM (IST)
इराणशी तणावादरम्यान अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो उद्यापासून तीन दिवसीय भारत दौऱ्यावर येणार आहेत. २३ मे २६ मे च्या कालावधीत ते भारतात असतील. यावेळी ते भारतातली विविध ठिकाणांना भेट देणार आहेत. हा दौरा जागतिक राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यात अमेरिका आणि भारतातील धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर लक्ष्य केंद्रित असेल. विशेष करुन उर्जा क्षेत्रातील सहकार्य आणि क्वाड देशांच्या आघाडीवर महत्त्वपूर्ण चर्चा होईल.
22 May 2026 01:20 PM (IST)
आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेषतः युरोपीय देशांमध्ये राहणाऱ्या भारतीय आणि हिंदू समुदायाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. युनायटेड किंगडम ( United Kingdom) मध्ये हिंदूंच्या विरोधात होणाऱ्या द्वेषपूर्ण गुन्ह्यांमध्ये (Hate Crimes) कमालीची वाढ झाली आहे. या वाढत्या घटनांचा अचूक मागोवा घेण्यासाठी, भेदभावाची नोंद करण्यासाठी आणि हिंदू समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी ब्रिटनमध्ये पहिल्यांदाच ‘अँटी-हिंदू हेट मॉनिटरिंग सेंटर’ (Anti-Hindu Hate Monitoring Center) नावाचे एक नवीन व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे. ब्रिटनमधील हिंदू संघटना आणि नेत्यांनी एकत्र येऊन घेतलेला हा निर्णय तेथील वाढत्या तणावाचे गांभीर्य अधोरेखित करतो.
22 May 2026 01:10 PM (IST)
निवडणूक आयोगाने जून-जुलैमध्ये रिक्त होणाऱ्या २४ जागांसाठी निवडणुका जाहीर केल्या आहेत. तसेच, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमधील दोन राज्यसभा जागांच्या पोटनिवडणुकांच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. १० राज्यांमधील २४ राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ जून-जुलैमध्ये संपत आहे. निवडणूक आयोगाने सर्व २४ जागांसाठी निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत.
ज्या १० राज्यांमध्ये विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ २१ जून ते १९ जुलै दरम्यान वेगवेगळ्या तारखांना संपत आहे, तेथे राज्यसभा जागांसाठी निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, द्विवार्षिक निवडणुकांसाठी १८ जून रोजी मतदान होईल आणि त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. निवडणूक आयोग १ जून रोजी अधिसूचना जारी करेल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ८ जून आहे.
22 May 2026 01:02 PM (IST)
पिंपरी-चिंचवड परिसराला हादरवून सोडणाऱ्या रावेत येथील फर्निचर व्यावसायिक गोळीबार प्रकरणात पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. तब्बल २ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी कुख्यात बिश्नोई गँगच्या नावाने हा थरारक गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी थेट उत्तराखंडमध्ये धडक कारवाई करत, बिश्नोई गँगशी संबंधित असलेल्या तीन सराईत गुंडांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे गुन्हेगारी जगतात प्रचंड खळबळ उडाली होती.
22 May 2026 12:48 PM (IST)
एक मोठी बातमी समोर आली आहे. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेऊन राज्यातील निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी राज्यात राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेबाबत सविस्तर निवेदन देण्यात आले. या शिष्टमंडळात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज पाटील, शिवसेना (उबाठा) नेते तथा युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, माजी मंत्री अनिल परब, राजेश टोपे, डॉ. विश्वजीत कदम, खासदार धैर्यशील पाटील, माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन सावंत, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर, सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन तसेच महाविकास आघाडीचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
22 May 2026 12:36 PM (IST)
पुणे शहरातील वाढती वाहनसंख्या लक्षात घेता वाहन चालविण्याच्या परवान्यांसाठी नागरिकांचा प्रतिसाद वाढत असल्याचे दिसून आले आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) पुणे यांच्या माध्यमातून मागील दोन वर्षांत तब्बल ४ लाख ३९ हजार २५३ वाहन चालकांनी कायमस्वरूपी वाहन चालविण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) प्राप्त केला आहे. यामध्ये दुचाकी, चारचाकी तसेच इतर वाहनांचा समावेश आहे.
22 May 2026 12:24 PM (IST)
टोळी युद्धाच्या वर्चस्व तसेच बदल्याच्या भावनेतून आंदेकर टोळीकडून झालेल्या तिसऱ्या खूनाच्या प्रयत्नातील फरार आरोपींना गुन्हे शाखेने जेरबंद केले. तत्पुर्वी हे तरुण आंदेकर टोळीचे नंबरकारी (सदस्य) असल्याचे समोर आले असून, एक आरोपी मोक्कातील आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, त्यांना कार्ला येथील एकविरा देवीच्या डोंगरावरून ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, या गोळीबाराने शहरात मोठी खळबळ उडाली होती. वनराज आंदेकरच्या खूनातील आरोपीचा भाऊ अक्षय उर्फ बाळू बापू म्हस्के (वय २६) याच्यावर गोळीबार झाला. यामध्ये अक्षय हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने ही कारवाई केली आहे. आफ्ताफ शरीफ सय्यद (रा. भाग्यदेवनगर, वैशाली नर्सिंग होम, कोंढवा खुर्द), ऋषी प्रसाद मोहन आंबट (वय २१, रा. चुडामण तालीमजवळ, नाना पेठ), आवेज अशपाक शेख (वय २६, रा. गणेश पेठ), वेदांत श्रीनिवास टेमगिरे (वय १९, रा. भवानी पेठ, पालखी विठोबा चौक), अमन फारूक बागवाले (वय २१, रा. गोल्डन ग्रेस, भवानी पेठ) अशी गुन्हेगारांची नावे आहेत. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. अक्षय मस्के याच्यावर हल्ला केल्याप्रकरणी त्याची पत्नी करुणा अक्षय मस्के (वय २२, रा. स्वामी समर्थनगर, आंबेगाव पठार) यांनी सहकारनगर पोलिसांत तक्रार दिली आहे.
22 May 2026 12:12 PM (IST)
पुणे जिल्ह्यात यंदा तीव्र उन्हाळ्याच्या झळांमुळे पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले असून, जिल्ह्यातील तब्बल १ लाख ३८ हजार ७१५ नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. सध्या जिल्ह्यातील ८१ गावे आणि ३७९ वाड्या-वस्त्यांवरील पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाकडून ८२ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे, यंदा जिल्ह्यातील आंबेगाव तालुका सर्वाधिक पाणीटंचाईग्रस्त ठरला असून, पारंपरिक दुष्काळी समजल्या जाणाऱ्या पुरंदर तालुक्यालाही त्याने टंचाईच्या तीव्रतेत मागे टाकले आहे.
22 May 2026 11:59 AM (IST)
अभिजीत दीपके या तरुणाने स्थापन केलेल्या 'कॉकरोच जनता पार्टी'ने देशभरात धुमाकूळ घातला आहे. अवघ्या 7 दिवसांत या पार्टीचे इन्स्टाग्रामवर 18 मिलियनहून जास्त फॉलोअर्स झाले आहेत. सोशल मीडियाद्वारे तयार झालेल्या या चळवळीचे राजकीय पक्षामध्ये रुपांतर होईल का? असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात असतानाच "अभिजीतने राजकारणात जाऊ नये, चळवळ आता थांबवावी", अशी प्रतिक्रिया त्यांच्या वडिलांनी दिली आहे. अभिजीतचे वडील भगवान दीपके म्हणाले, "फॉलोअर्स वाढले तरी आम्हाला चिंता आहे. अभिजीतने राजकारणात जाऊ नये, आता चळवळ थांबवावी. प्रसिद्धीमुळं भीती वाटते, दुसरं काही नाही. उचलून नेतात, अटक करतात, आपल्याला याची काय सवय नाही, आपल्या मुलाला अटक करतील का असं वाटते" अशी भीती भगवान दीपके यांनी व्यक्त केली.
22 May 2026 11:43 AM (IST)
मनोज जरांगे यांची भेट घेण्याआधी प्रसाद लाड छत्रपती संभाजीनगरमधील एका हॉटेलमध्ये थांबले होते. यावेळी प्रसाद लाड थांबलेल्या हॉटेलमध्ये दोघांनी शिरण्याच्या प्रयत्न केला. शिवाय याआधी लाड यांच्या पीएला धमकीचा फोन आला होता. या धमकी प्रकरणी योगेश शितोळे पाटील, गणेश उगले यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
22 May 2026 11:37 AM (IST)
काँग्रेसने संघटनात्मक बांधणी करताना लातूरच्या जिल्हाध्यक्षपदी पुन्हा अभय साळुंके यांची तर शहराध्यक्षपदी प्रा. शिवाजी जवळगेकर यांची निवड जाहीर केली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने देशभरात ‘संघटन सृजन अभियान’ राबविण्यात आले होते. या अभियानांतर्गत देशभरातील विविध सेलच्या अध्यक्षपदांची निवड करण्यात आली आहे.
22 May 2026 11:23 AM (IST)
मागील चार दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात डिझेल टंचाईमुळे वाहतूक व्यवस्थेवर देखील मोठा परिणाम झाला आहे, डिझेल मिळत नसल्याने जिल्ह्यात एक हजार पेक्षा अधिक ट्रॅक चार ते पाच दिवसापासून अडकून पडले आहेत. परराज्यातील वाहनचालक देखील डिझेल मिळत नसल्याने अडकून पडले आहेत.
22 May 2026 11:16 AM (IST)
इंधनटंचाईचा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. शेतीच्या कामासाठी इंधनाची आवश्यकता असणाऱ्या शेतकरी पेट्रोलपंपावरून डिझेल घेऊन जात असतात. मात्र, परभणीत 7/12 दाखवला तरच इंधन मिळणार असल्याचे पेट्रोल पंप चालकांनी सांगितले आहे.
22 May 2026 11:07 AM (IST)
भाजप आमदार प्रसाद लाड हे मनोज जरांगे पाटील यांना भेटले आहेत. दोघांमध्ये चर्चा सुरू आहे. प्रसाद लाड म्हणाले की, दादांच्या सात आठ मागण्या मी समजून घेणार आहे. मागण्या मान्य का होऊ शकल्या नाहीत हे समजून घेणार आहे.
22 May 2026 11:04 AM (IST)
भारतातील सर्वात भीषण दहशतवादी हल्ल्यांपैकी एक असलेल्या पुलवामा हल्ल्याचा मुख्य सुत्रधार हमजा बुर्हान याची पाकिस्तानात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या काश्मीर खोऱ्यातील मुझफ्परबाद येथे अदांधुंद गोळीबारात त्याला ठार करण्यात आले असून या हल्ल्यांची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गॅँगने स्वीकारलच्या दावा सोशल मीडियावर केला जात आहे. परंतु अद्याप अधिकृतपण याची पुष्टी करण्यात आलेली नाही.
22 May 2026 10:54 AM (IST)
छत्रपती संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद जागेवर भाजपने दावा केल्याच्या चर्चावर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनीही या जागेवर दावा केला आहे. ही जागा पूर्वीपासून शिवसेनेची आहे आणि पुढेही शिवसेनेचीच राहील, भाजपचे संख्याबळ कितीही असले तरी ही जागा आम्ही सोडणार नाही, असे ठामपणे त्यांनी सांगितले. संजय शिरसाट म्हणाले, शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी तालुकानिहाय बैठका घेतल्या जात असून, या मोहिमेचे नेतृत्व खासदार श्रीकांत शिंदे करत असल्याचे शिरसाट यांनी सांगितले. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची त्याती सुरू आहे.
22 May 2026 10:44 AM (IST)
अभिनेता शुभंकर तावडे जवळपास दशकानंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार आहे. त्याला TV क्षेत्रात काम करताना पुन्हा एकदा पाहण्यासाठी त्याचे चाहतेमंडळी उत्सुक आहेत. अभिनेता स्टार प्रवाहवरील आगामी मालिका ‘पाठराखीण’ मध्ये झळकणार आहे. पाठराखीण मालिकेत प्राजक्ता गायकवाड आणि अभिनेत्री गौरी इंगवले या दोन बहिणी आणि त्यांच्या नात्यावर आधारित कथा दाखवण्यात आली आहे. याच मालिकेत आलोक सूर्यवंशीच्या भूमिकेत शुभंकर तावडे दिसून येणार आहे. तर त्याच्या जोडीला त्याचा सख्खा लहान भाऊ म्हणून आरव सूर्यवंशी हे पात्र अभिनेता आशय कुलकर्णी साकारणार आहे.
22 May 2026 10:34 AM (IST)
इराण आणि अमेरिकेतील तणाव प्रचंड वाढत चालला आहे. नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला आक्रमक इशारा दिला आहे. इराणकडे असलेला अत्यंत संवेदनशील आणि घातक युरेनियम साठा अमेरिकेच्या ताब्यात घेणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. गरज पडल्यास युरेनियमचा साठा नष्टही करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. इराणला अण्वस्त्र सज्ज होऊ न देणे यामागाचा उद्दिष्ट असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.
22 May 2026 10:24 AM (IST)
दर्यापूरमधील आनंद नगर भागात अल्पवयीन मुलगी घरात असताना तिच्या घरात शिरून दोन अनोळखी भामट्यांनी हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. चार-पाच दिवसांपूर्वी याच भागातील प्रज्वल तायडे या तरूणाचा घरात शिरून खून करण्यात आला होता. हे प्रकरण ताजे असतानाच हा पुन्हा हल्ला करण्याची घटना घडल्याने परिसरातील नागरिकामध्ये भीतीचे वातावरण आहे.
22 May 2026 10:14 AM (IST)
Free Fire Max मध्ये मोको स्टोअर लाईव्ह झाला आहे. हा अरायव्हल ॲनिमेशन मोको स्टोअर आहे. या स्टोअरद्वारे प्लेअर्सना गेममधील एक्सक्लूसिव इन-गेम रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळणार आहे. मोको स्टोअरमध्ये इन गेम रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी तुम्हाला स्पिन करावे लागणार आहे. गेममध्ये स्पिन करण्यासाठी प्लेअर्सना डायमंड्सचा वापर करावा लागतो.






