नाशिक : झिकाप्रकरणी (Zika Virus) महापालिकेच्या आरोग्य विभागाने पुणे येथील प्रयोगशाळेतून पाठविलेले सर्वच्या सर्व म्हणजे २३ गरोदर महिलांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती मनपा आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. नाशिकमध्ये झिकाचा संशयित रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेऊन बरा झाला आहे. मात्र, शहरातील ज्या भागात तो राहायचा त्या परिसरात मनपाच्या आरोग्य विभागाने विशेष तपासणी सुरू केली आहे.
एकीकडे डेंग्यूसारख्या आजाराने डोके वर काढले असताना झिका संशयित रुग्ण सापडल्याने मनपाच्या आरोग्य विभागाची धावपळ झाली होती. झिकाचा फैलाव होऊ नये म्हणून विशेष खबरदारी घेण्यात येत असल्याने परिसरातील गरोदर महिलांवर त्याचा प्रभाव अधिक लवकर पडू शकतो, म्हणून त्यांची तपासणी करून नमुने जमा करून पुण्याला रवाना करण्यात आले होते, अशी माहिती मनपा मलेरिया विभागप्रमुख डॉ. नितीन रावते यांनी दिली.
शहरात बांधकामाच्या साईटच्या बाजूला साचणाऱ्या पाण्यामुळे डेंग्यूचे डास वाढण्याचे प्रमाण दिसून येत आहे. ज्या बांधकामाच्या ठिकाणी हे रुग्ण आढळून आले, तेथील संबंधितांना आरोग्य विभागाच्या वतीने नोटिसाही पाठविण्यात आल्या; तर कोणाकडून जागेवर दंड आकारण्यात आला. तरीही हजारी पार झालेल्या डेंग्यू रुग्णांची संख्या मागील आठवड्यापासून कमी होत आहे. डेंग्यू निर्मूलनासाठी आरोग्य विभागाच्या वतीने सर्वेक्षण करण्यात येत आहे.