मालेगाव : तालुक्यातील दाभाडी येथील तरूणाची लग्न लावून (Fake Marriage Promise) आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तरुणीसह पाच जणांवर ठकबाजीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाभाडी येथील 31 वर्षीय तरुणाशी लग्न लावून दिलेल्या तरुणीने व तिच्या सोबतच्या विलास भालेराव (रा. सावरगाव ता. येवला), संदीप मोळेकर अशा मालेगाव व नाशिक येथील एकूण 5 जणांनी लग्न लावून देण्याच्या मोबदल्यात फिर्यादी तरुणाकडून अडीच लाखांची रक्कम आणि 80 हजारांचे सोन्याचे दागिने चोरुन फसवणूक केली.
एक एप्रिल रोजी नववधू दाभाडीच्या तरुणाच्या घरातून दागिने घेऊन लंपास झाली होती. नाशिक, दाभाडी व दसाणे येथे सदर घटनाक्रम घडला. याप्रकरणी तरुणाच्या फिर्यादीवरुन तालुका पोलीसांनी पाच जणांवर ठकबाजीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास उपनिरीक्षक तुषार भदाणे करीत आहेत. सदर तरुणीकडे दोन आधार कार्ड असल्याचे देखील समोर आले. यामुळे संबंधित टोळी नियोजितरित्या फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
दाभाडी येथील तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार, नाशिक व नगरमधील दोन महिला आणि दोन पुरुष दलालांनी त्याच्याशी संपर्क साधत लग्न जुळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार अडीच लाखाच्या मोबदल्यात योग्य तरुणी दाखविण्यात आली होती. यानंतर लग्न लावून देण्यात आले. वधूला ८० हजार रुपयांचे दागिने घेण्यात आले. मात्र, दागिने आणि रोख दहा हजार रुपये घेऊन एक एप्रिल रोजी पोबारा केला.
तरुणीला १४ जुलैपर्यंत पोलिस कोठडी
पोलिसांनी तरुणीला ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने १४ जुलैपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. संबंधित तरुणीने इतरही तरुणांना गंडा घातला असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. तरुणांनी तक्रारीसाठी पुढे यावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक रवींद्र मगर यांनी केले आहे.