पुणे : पुण्यात ओशो यांच्या आश्रमात दोन गटात बुधवारी झालेल्या वादानं ओशो आश्रम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आश्रम व्यवस्थापन आणि ओशोंचे अनुयायी असा हा वाद चांगलाच रंगलाय. काल ओशोंच्या काही अनुयायांनी गेट तोडत या आश्रमात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं राडा झाला, पोलिसांना पाचारण करावं लागलं. सन्यासी माळा घालून आलेल्यांना प्रवेश नाकारल्यानं हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येतंय. यात ओशोंचे अनेक परदेशातील अनुयायी होते. कोण होते ओशो, काय होतं त्यांचं तत्वज्ञान आणि पुण्यात कोरेगाव पार्कात असेलल्या या भव्य आश्रमात नेमकं घडतं तरी काय, हे जाणून घेऊयात
कोण होते आचार्य रजनीश म्हणजेच ओशो
आचार्य रजनीश म्हणजेच ओशो हे विसाव्या शताकील अशा काही व्यक्तींपैकी एक आहेत, जे त्यांच्या वेगळ्या विचारांमुळे वादात राहिले. १९७९ साली ओशो यांचं पुस्तक ‘संभोग से समाधी की ओर’ यानं मोठा वादंग निर्माण केला. अनेक धर्म मार्तांडामध्ये या पुस्तकामुळं खळबळ उडाली. या एका पुस्तकाच्या आणि वाचाराच्या आधावर ओशोंना बहिष्कृत करण्यात आलं. तरीही ओशोंचं तत्वज्ञान जगानं स्वीकारलंच. ओशो यांच्या पुण्यातील कोरेगाव परिसरातील प्रशस्त आश्रम आणि तिथं असलेलं ओशो इंटरनॅशनल यातलं खुलपणं आणि परदेशी अनुयायांची तिथं होणारी गर्दी नेहमीच चर्चेत राहिली. या आश्रमात नेमकं घडतं तरी काय याबाबत अनेक दंतकथा पसरु लागल्या. त्याची चर्चा झडू लागली. या आश्रमात परस्परांशी खुलेाम संबंध ठेवण्याची मुभा आहे का, असा प्रश्नही चर्चिला गेला.
कोरेगावातील आश्रमाविषयी
पुण्यातल्या कोरेगाव परिसरात 28 एकर जागेत ओशो आश्रम आहे. 1974 साली हा आश्रम बांधण्यात आला. कोरेगाव पार्क हा पुण्यातील प्रतिष्ठित भागांपैकी एक आहे. या जागेची किंमत आता कोट्यवधींच्या घरात आहे. या आश्रमात गवताचे गालिचे, संगमरवरी दगडांवर केलेलं नक्षीकाम, आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्विमिंग पूल अशी आकर्षक दृश्य पाहायला मिळतात.
काय आहेत आश्रमाचे नियम?
1. आश्रमात प्रवेश करण्यापूर्वी मुख्य गेटवर नोंदणी करावी लागते. त्यानंतर नोंदणी केलेल्या रक्ताचे नमुने घेतले जातात. त्यात एचआयव्ही चाचणीचा ही समावेश असतो. त्यानंतर आश्रमात प्रवेश दिला जातो. त्यासोबत ओळखपत्रही देण्यात येतं.
2. गणवेश– या आश्रमात येणाऱ्या प्रत्येके अनुयायाला गणवेश परिधान करणे बंधनकारक आहे. लाल राखाडी आणि पांढऱ्या रंगाचे हे गणवेश असतात. आश्रमात असताना गणवेशात असणंच बंधनकारक आहे. आश्रमाबाहेर हा गणवेश विकत मिळतो.
3. निवास– आश्रमात 6 ते 10 हजार रुपये प्रति दिवसाचे मोजून राहण्याची व्यवस्था आहे. तसचं आश्रमाच्याबाहेरच्या हॉटेलमध्येही निवास करण्याची मुभा आहे.
4. ओळखसत्र – आश्रमात आल्यानंतर आश्रमाची ओळख करुन देण्यात येते. तिथं फेरपटका मारुन आश्रमात काय काय आहे ते दाखवण्यात येतं.
5. रात्रीच्या वेळी जेवण, नाचगाण्याचे कार्यक्रम आयोजित केलेले असतात. यासह ध्यानधारणा, ओशोंची भाषणंही ऐकवली जातात.
आश्रमातील व्यक्तींचे अनुभव
ओशोंचा असाच एक आश्रम अमेरिकेत ऑरेगनमध्येही आहे. नेटफ्लिक्सवर असलेल्या वाईल्ड वाईल्ड कंट्री या डॉक्युमेंट्रीत या आश्रमाबाबत माहिती देण्यात आलीय. या डॉक्युमेंट्रीचा रिव्ह्यू द गार्डियनचे पत्रकार सॅम वॉल्सेट यांनी केला होता. त्यांनी याबाबत अधिक माहिती जमा केली. त्यावेळी त्यांनी ओशोंच्या पुण्याच्या आश्रमात राहिलेल्या नोवा मैक्सवेलची मुलाखत घेतली.
काय सांगितलं नोवानं मुलाखतीत ?
नोवाचे आई वडील त्याला सोबत घेऊन 1976 साली लंडनमधील व्यवसाय सोडून पुण्याच्या आश्रमात येऊन राहिले होते. आश्रमात नोवा आणि त्याच्या आई वडिलांना वेगवेगळं ठेवण्यात आलं होतं. आश्रमात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला नवं नाव देण्यात येत असे. नोवाला स्वामी देव रुपम असं नाव मिळालं होतं. नोवा इतर मुलांसोबोत एका झोपडीत राहत असे. त्यावेळी आश्रमात ऑस्ट्रेलिया, जर्मन आणि अमेरिकेतीलही मुलं होती. तो जेव्हा लंडनला परतला तेव्हा तो 10 वर्षांचा होता. त्यावेळी त्याला लिहिता वाचता येत नव्हतं मात्र धूम्रपान करण्याची सवय त्याला लागली होती.
आश्रमात एकमेकांशी खुलेआम संबंध ठेवण्यात येतात का, या प्रश्नावर नोवानं असं काही घडत नसल्याचं सांगितलं होतं. मात्र आश्रमात येणारे अनुयायी विक्षिप्त वागतात, असं त्यानं मान्य केलं होतं. यात हसण्याची एक पद्धत होती. त्यात आपल्या सर्व भावनांचा स्वीकार करण्याचा संकेत होता. रात्री लोकं हसता हसता अचानक रडू लागत असतं. नोवा लहान होता, त्यावेळी त्याला शरिरसंबंधांबाबत माहिती नसल्याचं त्यानं सांगितलंय. आश्रमात लैगिंक संबंध ठेवणाऱ्यांचे आवाज ऐकायला येत असत.
नोवाच्या आई वडिलांचे वेगवेगळे पार्टनर
नोवाच्या आई वडिलांचे वेगवेगळे पार्टनर आहेत, याची कल्पना होती, असं नोवानं सांगितलंय. मात्र याबाबत त्यांनी कधी निराशा व्यक्त केली नाही, असंही नोवानं सांगितलं. हे सगळं शानदार आहे आणि तूही शानदार आहेस, असं त्याच्या वडिलांनी नोवाला सांगितलं होतं. मात्र त्याच्या आईचा संघर्ष सुरु होता, याची कल्पना त्याला होती. जे काही चाललं होतं, त्याबाबत त्याच्या मनात अनेक प्रश्न होते. एकत्रित कुटुंब आश्रमात हरवून बसल्याचंही नोवानं सांगितलं. जेव्हा तो आश्रमातून बाहेर आला तेव्हा या जगाशी जोडून घेण्यात त्याला अडचणींचा सामना करावा लागल्याचंही नोवानं मान्य केलंय.