Today's Maharashtra Breaking News Updates in marathi 16.10.2026
Maharashtra to World Breaking News :
दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या वतीने आज कनॉट प्लेसच्या सेंट्रल पार्क परिसरात नवीन आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. पण दिल्ली सरकारने संपूर्ण परिसर आंदोलनासाठी बंद केल्याची माहिती समोर आली आहे.
देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा, सुमारे ३०,२०० कोटी रुपयांचा जिओ प्लॅटफॉर्म्सचा (Jio Platforms) आयपीओ २१ ऑक्टोबरला खुला होणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील रोमांचक सामना झाल्यानंतर आता बेंगळुरू येथे निर्णायक सामना खेळवला जाणार आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव सौदी अरेबियातील जेद्दाह येथे १६ ते २५ ऑक्टोबर दरम्यान होणारी ‘फिफा फायनल्स’ (FIFAe Finals) स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे.
मुंबईतील छेदा नगर जंक्शनजवळ भरधाव टँकरची बेस्ट बसला धडक बसली. या अपघातात चार प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आङे.
16 Oct 2026 09:50 AM (IST)
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडच्या (Jio Platforms Limited) प्रस्तावित आयपीओबाबत (IPO) मोठी घोषणा करण्यात आली आहे. जिओचे नेतृत्व करणारे आकाश अंबानी आणि ईशा अंबानी यांनी एका विशेष पत्रकार परिषदेत कंपनीच्या भविष्यातील वाटचालीवर आणि आयपीओच्या तारखांवर प्रकाश टाकला.
जिओचा हा मेगा आयपीओ २१ ऑक्टोबर रोजी रिटेल गुंतवणूकदारांसाठी खुला होणार असून, गुंतवणूकदार २३ ऑक्टोबरपर्यंत यामध्ये सबस्क्राईब करू शकतील. देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनीच्या या आयपीओकडे संपूर्ण देशातील शेअर बाजाराचे आणि गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.
16 Oct 2026 09:40 AM (IST)
भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या टीम इंडियातून बाहेर असून, भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी त्याने देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, २०२६-२७ च्या रणजी ट्रॉफी हंगामात पुनरागमन करण्याचे त्याचे प्रयत्न सध्यातरी यशस्वी ठरताना दिसत नाहीत. चंदीगडविरुद्धच्या पहिल्या सामन्यानंतर आता हिमाचल प्रदेशविरुद्धच्या आगामी सामन्यासाठीही मुंबईच्या संघात त्याला स्थान मिळालेले नाही. सूर्यकुमार यादवने स्वतःला रणजी ट्रॉफीसाठी उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, चंदीगडविरुद्धच्या पहिल्या सामन्याप्रमाणेच आता हिमाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यासाठीही मुंबईच्या निवड समितीने त्याला संघात स्थान दिलेले नाही.
16 Oct 2026 09:40 AM (IST)
राज्यात वाढत्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आणि १३ तालुक्यांमध्ये निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीमुळे जिल्हा प्रशासनाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि कडक निर्णय घेतला आहे. नाशिक जिल्ह्यातील पशुधनासाठी चारा सुरक्षित राहावा यासाठी जिल्ह्याबाहेर चारा वाहतूक आणि विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्यातून हिरवा चारा, कडबा, कुट्टी आणि मिश्रित पशुखाद्याची इतर जिल्ह्यांमध्ये किंवा परराज्यात होणारी वाहतूक आणि विक्री तात्काळ प्रभावाने थांबवण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील १३ तालुक्यांत भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
16 Oct 2026 09:30 AM (IST)
ऐन सणासुदीच्या काळात सोने-चांदी खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया मजबूत झाल्याचा थेट आणि सकारात्मक परिणाम खानदेशातील सुवर्णनगरी समजल्या जाणाऱ्या जळगाव सराफा बाजारावर पाहायला मिळत आहे.
जळगावच्या बाजारात अवघ्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात १,७०० रुपयांची, तर चांदीच्या दरात तब्बल ११,००० रुपयांची मोठी घसरण नोंदवली गेली आहे.घसरणीनंतर सोन्याचे भाव १,४८,००० रुपयांवरून खाली येत १,४६,७०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले आहेत.
16 Oct 2026 09:24 AM (IST)
Sunil Tatkare : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या आर्थिक मदतीवरून आता राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हि मदत जाहीर केल्यानंतर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. 5 हजारांच्या मदतीवरून विरोधकांनी सरकारला घेरले असतानाच आता महायुती सरकारलाच घरचा आहेर भेटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी यावरून मोठे भाष्य केले आहे. सुनील तटकरे यांनी शेतकऱ्यांना दिली जाणारी पाच हजार रुपयांची अग्रीम मदत अपुरी असल्याचे म्हटले आहे. ही मदत वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.






