Photo Credit- X@Ajit Pawar अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंना अक्षरश: झापलचं; देवगिरी बंगल्यावर नेमकं झालं काय?
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चांगलेच चर्चेत आहेत. एका सभेत शेतकऱ्याने कर्जमाफीबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी, “तुम्ही ती रक्कम लग्न आणि इतर समारंभांसाठी वापरता,” असे धक्कादाय विधान त्यांनी केले होते. कोकाटेंच्या या विधानामुळे चारही बाजूंनी त्यांच्यावर टीका होऊ लागली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कोकाटेंच्या या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर काल पुन्हा एकदा अजित पवार यांनी भर बैठकीत माणिकराव कोकाटेंना झापल्याची माहिती पुढे आली आहे.
एका वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिले आहे. काल ( 8 एप्रिल) सांयकाळी देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी सर्व नेते वेळेत उपस्थित राहिले. मात्र, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे मात्र तब्बल अर्धा तास उशीरा पोहोचले. कोकाटे उशिरा आल्यानंतर अजित पवारांनी त्यांच्यावर चांगलाच संताप व्यक्त केला आणि कोकाटेंना थेट खडसावत स्पष्ट शब्दांत सुनावले.
दिल्ली, बिहारसह ‘ही’ राज्ये तरुणांना प्रशिक्षण देण्यात पिछाडीवर; परिषदही नाही स्थापन
सातत्याने वादग्रस्त विधाने करणे, शिस्तभंगाचे वर्तन आणि पक्ष कार्यालयातील जनता दरबारास गैरहजर राहणे, अशी अनेक कारणांसाठी अजित पवारांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंवर नाराजी व्यक्त केली. अजित पवारांनी खडसावल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानावर युटर्न घेत जाहीर माफी मागितली. “माझं विधान विनोदाच्या स्वरूपात होतं, मात्र मस्करीची कुस्करी झाली. जर माझ्या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांचा सन्मान दुखावला असेल, तर मी दिलगिरी व्यक्त करतो.”
दरम्यान, अजित पवार यांनी ट्विटद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या साप्ताहिक आढावा बैठकीबाबत माहिती दिली. या बैठकीत लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यावेळी प्रत्येक मतदारसंघातील विकासकामांचा आढावा घेण्यात आला. तसेच, निधीसाठी विकासकामे कामे थांबू नयेत आणि नागरिकांना अडचणी निर्माण होऊ नयेत, यावरही चर्चा करण्यात आली.
दरमहा 30 हजार कमावणारा सुद्धा होईल Hyundai Exter CNG चा मालक, फक्त एवढा असेल EMI?
माणिकराव कोकाटे नेमके काय म्हणाले होते?
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे काही दिवसांपूर्वी नाशिक दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी एका शेतकऱ्याने त्यांना थेट प्रश्न विचारला – “कर्जमाफी होणार का?” या प्रश्नावर कोकाटे काहीसे संतप्त झाले आणि उत्तर देताना त्यांनी वादग्रस्त विधान केले. कोकाटे म्हणाले, “कर्जमाफी झाली की शेतकऱ्यांना पैसे मिळतात. मात्र, हे पैसे शेतीसाठी वापरण्यात येतात का? हेच पैसे तुम्ही लग्न कार्य, साखरपुडा यांसारख्या सामाजिक कार्यक्रमांसाठी खर्च करता.”
या विधानानंतर जोरदार वाद निर्माण झाला. विरोधकांनी कोकाटेंवर टीकेचा भडिमार केला आणि त्यांनी माफी मागावी, तसेच मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. या टीकेनंतर कोकाटे यांनी आपल्या विधानाबाबत दिलगिरी व्यक्त केली. “माझ्या बोलण्यामुळे शेतकऱ्यांचा अपमान झाला असेल, तर मी दिलगिरी व्यक्त करतो. मस्करी करताना कदाचित मर्यादा ओलांडली गेली,” असे त्यांनी स्पष्ट केले.