जळगाव येथून विमानसेवा सुरू पण संभाजीनगरचा विचार नाही.... (Photo Credit - X)
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): नाशिक येथे होणाऱ्या भव्य कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव ते नाशिक अशी नवी विमानसेवा लवकरच सुरू होणार आहे. एका बाजूला खान्देशातील लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे जळगावला ही सोय मिळत असताना, दुसऱ्या बाजूला मराठवाड्याची पर्यटन राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथून नाशिकसाठी अशी कोणतीही सेवा सुरू करण्याचा विचार प्रशासनाच्या ध्यानीमनी नसल्याचे चित्र आहे.
तांत्रिकदृष्ट्या शक्य असतानाही दुर्लक्ष
ही सेवा तांत्रिकदृष्ट्या सहज शक्य आहे. कारण कुंभमेळ्याला येणारे किमान ४० टक्के भाविक श्रीक्षेत्र वेरुळ येथे घृष्णेश्वराच्या दर्शनास येणार आहेत, हे लक्षात घेऊन जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालय पर्यटन विभागाकडून एकीकडे नियोजन केले जात आहे. खान्देशातील लोकप्रतिनिधींनी जळगाव ते नाशिक ही विमानसेवा सुरू करण्याबाबत पाठपुरावा केला आहे व ही सेवा कुंभमेळ्यात प्रत्यक्षात उतरणार आहे. भाविकांच्या सोयीसाठी त्याची पडताळणीही झाली आहे.
धार्मिक पर्यटनाच्या दृष्टिने त्र्यंबकेश्वर, नाशिक ते वेरुळ ही ठिकाणे विमानसेवेने आणखी जवळ येतील. कुंभमेळा यासाठी मोठी संधी आहे, कारण १२ वर्षानंतर येत असलेल्या या पर्वास विदेशातूनही मोठ्या प्रमाणात हिंदू तसेच इतर भाविक, पर्यटक भारतात येणार आहेत, त्यांच्यासाठी ही सेवा अधिक सोयीची व वेळेची बचत करणारी राहील.
धार्मिक पर्यटनाला मिळेल चालना
कुंभमेळा हे धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे व लाखो लोकांचे आकर्षण असते. या काळात छत्रपती संभाजीनगर येथून नाशिकला विमानसेवा सुरू झाल्यास या जवळच्या ठिकाणांवरून दळणवळणाचे जलद उपयुक्त साधन उपलब्ध होऊ शकते. यामुळे धार्मिक पर्यटनाला नव्हे तर दोन्ही जिल्ह्यांतील आर्थिक व सामाजिक संबंध वाढू शकतील. छत्रपती संभाजीनगर ते नाशिक २०० किलोमीटर आहे. रेल्वेने जाण्यासाठी ३ तास व एसटीने पाच तास लागतात. रेल्वे, रस्ते मार्गाचा ताण पाहता ही विमानसेवा जलद, सुरक्षित, आरामदायक प्रवासासाठी योग्य सुविधा राहील, जेणेकरून परराज्यातील भाविकांनाही सुलभपणे वेरुळ गाठता येईल.
विमानसेवेस मिळेल संजीवनी
– चेतन राऊत, माजी अध्यक्ष मसिआ
“ही सेवा जळगावपेक्षा चिकलठाणा येथून संयुक्तिक आहे, याचा उद्योगांनाही लाभ होईल. केंद्र व राज्य सरकारांनीही यास प्राधान्य दिले पाहीजे. कुंभमेळ्यास येणारे जगभरातील अनेक पर्यटक थेट विमानाने वेरुळला येऊ शकतील. याची चाचपणी घेण्यास हरकत नाही. समृद्धीमुळे दीड तास नाशिक गाठता येते, विमानाने हा प्रवास अधिक जलद होईल.”






