₹७,१०६ कोटींच्या जळगाव-जालना रेल्वे मार्गाचे काम लवकरच सुरू होणार (Photo Credit - X)
नवीन रेल्वे स्थानके
विशेषतः जालना जिल्ह्यातील राजूर येथे भेट देणाऱ्या भाविकांसाठी हा मार्ग अत्यंत उपयुक्त ठरणार असून, जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना या रेल्वे मार्गाचा मोठा लाभहोणार आहे. औद्योगिक आणि कृषी विकासाला गती देण्यासह व्यापार वाढीस मदत करून दळणवळणाची सुलभता वाढविण्याच्या दृष्टीने हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रस्तावित नवीन मार्गासाठी रेल्वेने २००८-०९ मध्ये केलेल्या एका सर्वेक्षणात आरओआर (रेट ऑफ रिटर्न) नकारात्मक आला होता. त्या सर्वेक्षणादरम्यान जालना-जळगाव मार्गावर नागेवाडी, पिंपळगाव, बावणेपांगरी, राजूर, केदारखेडा, भोकरदन, सिल्लोड, अन्वी, गोळेगाव, अजिंठा, फर्दापूर, वाकोद, पिंपळगाव बुद्रुक, पहूर, सूनासगाव, जेरी, उमाळे, नशिराबाद, अशी संभाव्य रेल्वे स्थानके निश्चित करण्यात आली होती. कालांतराने आरओआर सकारात्मक आल्यानंतर केंद्र सरकारने जळगाव ते जालना रेल्वे मार्गाला मंजुरी दिली.
प्रकल्पाला मिळालेली मंजुरी
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री असताना रावसाहेब दानवे यांनी जानेवारी २०२२ मध्ये या मार्गाची घोषणा केली होती. सुमारे ७,१०५ कोटी ४३ लाख रुपये खर्च रेल्वे मार्गासाठी अपेक्षित आहे. राज्य सरकारने यापूर्वीच आपल्या हिश्याच्या ५० टक्के खर्चाची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. एकूण १७४ किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग प्रस्तावित असून, त्यापैकी जवळपास १४० किलोमीटरचा मार्ग जालना जिल्ह्यातून तर ३४ किलोमीटरचा मार्ग जळगाव जिल्ह्यातून जाणार आहे. या मार्गासाठी आवश्यक जमिनीचे संपादन करण्यासाठी प्रशासनाकडून सध्या कार्यवाही सुरू आहे. दरम्यान, जळगाव-भुसावळ रेल्वे मार्गावरील भादली स्थानकापासून जालना मार्ग निघणार असल्याने त्यादृष्टीने रेल्वे प्रशासनाने आता कार्यवाही सुरू केली आहे.
कामाला सुरुवात कधी होणार?
जळगाव-भुसावळ दरम्यान पाचव्या रेल्वे मार्गाचे काम करतानाच, प्रस्तावित जालना मार्गासाठी जळगाव-भादली दरम्यान नऊ किलोमीटरचा सहावा मार्ग टाकण्याच्या हिशेबाने आवश्यक जमिनीचे सपाटीकरण सुरू करण्यात येत आहे. भूसंपादनाची प्रक्रिया पार पडताच प्रत्यक्ष कामास लगेच सुरूवात केली जाईल, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. जालना जळगाव रेल्वेमार्ग सुरू होणार असल्यामुळे या दोन जिल्ह्यातील दळणवळणाचा मार्ग मोकळा होणार आहे. रेल्वेमार्गामुळे अनेक तालुक्यांच्या विकासाला गती मिळेल, असे चित्र आहे.






