 
        
        जायकवाडीसह मराठवाड्यातील प्रमुख धरणे १००% तुडुंब (Photo Credit - X)
छत्रपती संभाजीनगर: परतीच्या पावसानंतरही हवामानातील अनपेक्षित बदलामुळे सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे जायकवाडी सह मराठवाड्यातील बहुतेक सर्व प्रमुख धरणे १०० टक्के भरली आहेत. परिणामी विभागातील पिण्यासह सिंचनाचा प्रश्न मिटला असून, समाधान व्यक्त होत आहे. यंदा मान्सूनच्या चार महिने पावसाने दमदार साथ दिली. अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळला तर अतिवृष्टीने मोठे नुकसान केले. नद्या नाले दुथडी भरून वाहू लागले. शेतीपिकांसह घरे, गायगोठ्यांचेही नासधूस झाली.
एकीकडे असे नुकसान झालेले असताना असताना दुसरीकडे विभागातील धरणांमध्ये भरमसाठ पाणीसाठा जमा झाला. जायकवाडीसह विभागातील प्रमुख ११ धरणे तुडुंब भरली. यात जायकवाडी सह अनेक धरणामधून विसर्ग करण्यात आला. जायकवाडीतुन यंदा चार ते पाच वेळा विसर्ग करण्यात आला आहे. दरम्यान, सप्टेंबरमध्ये पावसाळा संपला.
ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसाला सुरुवात झाली. मात्र दोन आठवडे कोरडे गेल्यानंतर, चक्रीवादळे आणि हवामानातील अनपेक्षित बदलांमुळे अवकाळी पावसाला सुरुवात झाली. ते सत्र अद्याप सुरूच आहे. या पावसामुळे धरणांमध्ये पुन्हा आवक सुरु झाल्याने बुधवार, २९ ऑक्टोबरपर्यंत प्रमुख ११ पैकी ९ धरणे १०० टक्के भरली आहेत. तर सिद्धेश्वर धरण ९८ टक्क्यांवर आहे. याशिवाय निम्न दुधना ७५ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. परिणामी जायकवाडीसह अनेक धरणांमधून निसर्गाला सुरुवात करण्यात आली आहे. आजघडीला विभागातील प्रमुख ११ धरणांमध्ये एकूण ९७. ०६ टक्के पाणीसाठा जमा झालेला आहे.
यंदा जूनपासून आजतागायत झालेला पाऊस पाहता मराठवाड्यात ३८ टक्के अधिकच पाऊस झाला आहे. १ जून ते २९ ऑक्टोबरपर्यंत विभागाची सरासरी ७४६. २ मिमी इतकी आहे. तर झालेला पाऊस हा १०२९, ७ मिमी आहे. म्हणजेच एकूण १३८ टक्के पाऊस झाला आहे. हा सरासरीच्या ३८ टक्के अधिक आहे. मागील वर्षी १८. ९ टक्के अधिक पाऊस झाला होता हे विशेष. या पाणीसाठ्यामुळे भविष्यातील पिण्याची, सिंचनाची आणि उद्योगांसाठीच्या पाण्याची चिंता मिटली आहे. हवामानातील बदल पाहता नोव्हेंबरपर्यंत हा अवकाळी पाऊस बरसण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवलेली आहे.
| धरण | संबंधित नदी | पाणीसाठा (टक्क्यांमध्ये) | 
| जायकवाडी | गोदावरी | १००.०० | 
| येलदरी | पूर्णा | १००.०० | 
| माजलगाव | सिंदफणा | १००.०० | 
| मांजरा | मांजरा | १००.०० | 
| पैनगंगा | पैनगंगा | १००.०० | 
| मानार | मानार | १००.०० | 
| निम्न तेरणा | तेरणा | १००.०० | 
| विष्णूपुरी | गोदावरी | १००.०० | 
| सीना कोळेगाव | सीना | १००.०० | 
| सिद्धेश्वर | पूर्णा | ९७.७९ | 
| निम्न दुधना | दुधना | ७५.५० | 
| एकूण ११ धरणांचा साठा | – | ९७.०६ | 






