ऐतिहासिक पैठण नगरीत कचऱ्याचे साम्राज्य! ७० हजार लोकसंख्येसाठी अवघ्या २ घंटागाड्या
पैठण शहरातील दारूसलाम, परदेशीपुरा, सादात मोहल्ला, काहारवाडा, इंदिरानगर, नेहरू चौक, जोहरीवाडा, पापानगर, कावसन, नारळा, गंगलवाडी आदी भागांमध्ये सध्या कचरा व घाणीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरात शिवसेनेची सत्ता असताना स्वच्छतेच्या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका नागरिकांतून होत आहे. कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या खाजगी ठेकेदाराने काम सोडल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे.
परिणामी अनेक भागांमध्ये वेळेवर कचरा उचलला जात नसल्याने दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे यांच्या कार्यकाळात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहराला दहा घंटागाड्या उपलब्ध झाल्या होत्या. मात्र सध्या त्यापैकी तब्बल आठ घंटागाड्या नादुरुस्त अवस्थेत पडून असल्याची माहिती समोर आली आहे. केवळ दोन गाड्यांवर संपूर्ण शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी असल्याने स्वच्छता व्यवस्था कोलमडली आहे.
नगरपालिकेत सफाई कामगारांचीही मोठी कमतरता भासत आहे. अनेक कायमस्वरूपी सफाई कर्मचाऱ्यांना इतर कामांवर ठेवण्यात आल्याने प्रत्यक्ष स्वच्छता कामासाठी मनुष्यबळ अपुरे पडत आहे, त्यामुळे रस्ते, नाल्या आणि सार्वजनिक ठिकाणांची नियमित साफसफाई होत नसल्याचे चित्र दिसत आहे. पावसाळ्यात ही परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता असून डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो यांसारख्या साथीच्या आजारांना निमंत्रण मिळू शकते, असा इशारा आरोग्य क्षेत्रातील जाणकारांनी दिला आहे.
दरम्यान, नादुरुस्त घंटागाड्या दुरुस्त करण्यासाठी नगरपालिकेकडे पुरेशा निधीचा अभाव असल्याचे सांगितले जात आहे. मात्र शहराच्या आरोग्याशी संबंधित असलेल्या या गंभीर प्रश्नावर तातडीने उपाययोजना करून स्वच्छता व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
पैठण शहराची स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागात लवकरच १५ नवीन घंटागाड्या दाखल होणार आहेत. मात्र, विधान परिषदेची आचारसंहिता लागू झाल्यामुळे या घंटागाड्यांच्या प्राप्ती प्रक्रियेला विलंब झाला आहे दरम्यान, नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी नगरपरिषद प्रशासनाने पयांयी व्यवस्था म्हणून पाच ट्रॅक्टरद्वारे कचरा संकलन सुरू केले आहे. शहरातील घनकचरा उचलणे, कचऱ्याचे ढीग हटविणे आणि स्वच्छता मोहीम राबविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून स्वच्छता व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे नगराध्यक्ष विद्या भूषण कावसनकर यांनी स्पष्ट केले.






