शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीदिनी संजय शिरसाट भावूक (Photo Credit- X)
शिवसेनाप्रमुखांशिवाय दुःख वाटते
बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर शिवसेना फुटलीच नसती, असे मत शिरसाट यांनी व्यक्त केले. “त्यांचा शब्द अखेरचा शब्द असायचा. त्यामुळे कोणताही कार्यकर्ता त्यापुढे जाऊच शकत नव्हता. शिवसेनाप्रमुख आज नाही याचे दुःख वाटते. ते आज हवे होते. त्यांनी दिलेल्या मार्गावरच आम्ही चालण्याचा प्रयत्न करत आहोत,” असे मंत्री शिरसाट म्हणाले.
सत्ता गमावल्याबद्दल ‘उबाठा’वर टीका
शिवसेना फुटल्याच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर टीका केली. “थोड्याशा सत्तेसाठी तुम्ही (उबाठा) केलेले राजकारण तुम्हाला कुठे घेऊन गेले, ही भावना प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात आहे. आज काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्यासोबत नाहीत. मात्र, आता या निर्णयापासून माघार नाही, हीच भूमिका शिवसेनेची (शिंदे गट) आहे.”
स्थानिक पातळीवर महायुतीचा निर्णय
आगामी नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांबाबत बोलताना शिरसाट यांनी महायुतीच्या निर्णयाबद्दल माहिती दिली. “स्थानिक स्तरावर निर्णय घ्यावा, असा तिन्ही नेत्यांचा (शिंदे-फडणवीस-पवार) वरिष्ठ स्तरावर निर्णय झालेला आहे. संभाजीनगरमध्ये शिवसेनेची ताकद जास्त आहे. सहा शिवसेनेचे तर भाजपचे तीन आमदार आहेत. त्यामुळे शक्यतो आमदारांच्या पातळीवर निर्णय घ्यावा,” असे त्यांनी सांगितले. शिरसाट यांनी आवाहन केले की, “युती होत नसले तर समोरचा आपला शत्रू आहे असे समजून निवडणूक लढवू नये. मैत्रीपूर्ण लढत देऊन नगरपालिकांवर महायुतीचा भगवा फडकावा.”






