- टीईटीसाठी विक्रमी अर्ज!
- ४ लाख ७५ हजार विद्यार्थी परीक्षेत
- दीड लाखांनी वाढ
छत्रपती संभाजीनगर: राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने नोव्हेंबर महिन्यात शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२५ घेण्यात येणार आहे. यंदा परीक्षार्थ्यांची संख्या तब्बल दीड लाखांनी वाढून ४ लाख ७५ हजार ६६८ इतकी झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही संख्या १ लाख ४५ हजार ५९४ ने अधिक आहे. या परीक्षेला डी.एड. आणि बी.एड. धारकांसह कार्यरत शिक्षकही मोठ्या संख्येने बसणार आहेत. नुकत्याच आलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे, पदोन्नतीसाठी टीईटी आवश्यक ठरल्याने शिक्षकांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज भरले आहेत.
राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने २३ नोव्हेंबर रोजी टीईटी परीक्षा होणार असून, १५ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर या कालावधीत अर्ज मागविण्यात आले होते. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र निश्चिती, परीक्षार्थ्यांसाठी बैठक व्यवस्था, सुरक्षा, तसेच सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू आहे.
यंदा प्राथमिक स्तरावरील ‘पेपर-१’ साठी २ लाख ३ हजार ३३३ आणि माध्यमिक स्तरावरील ‘पेपर-२’ साठी २ लाख ७२ हजार ३३५ परीक्षार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मागील वर्षी ३ लाख ३० हजार ७४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, तर यंदा हा आकडा पावणेपाच लाखांवर पोहोचला आहे.
‘टीईटी’ निर्णयाविरुद्ध शिक्षक आक्रमक; सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याची मागणी
जिल्ह्यातून २४,३८५ परीक्षार्थी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एकूण २४ हजार ३८५ परीक्षार्थी टीईटी देणार आहेत. परीक्षा दोन सत्रांमध्ये, शहरातील ३७ केंद्रांवर पार पडेल.
- 
सकाळचे सत्र: सकाळी १०.३० ते दुपारी १.०० 
- 
दुपारचे सत्र: दुपारी २.३० ते सायंकाळी ५.०० 
सकाळच्या सत्रात ११ हजार १३४, तर दुपारच्या सत्रात १३ हजार २५१ विद्यार्थी बसणार आहेत. परीक्षा चार माध्यमांत घेतली जाणार असून, नियोजनासाठी ९ झोन तयार करण्यात आले आहेत.
| तपशील | माहिती | 
| परीक्षेची तारीख | २३ नोव्हेंबर २०२५ | 
| एकूण परीक्षार्थी | २४,३८५ | 
| परीक्षा केंद्रे | ३७ केंद्रे | 
| सकाळचे सत्र | स. १०:३० ते दु. १:०० (११,१३४ परीक्षार्थी) | 
| दुपारचे सत्र | दु. २:३० ते सायं. ५:०० (१३,२५१ परीक्षार्थी) | 
| माध्यम | चार माध्यमांत परीक्षा | 
| नियोजन | ९ झोन (४३ केंद्रसंचालक कार्यान्वयन करतील) | 
एकूण ४३ केंद्रसंचालक परीक्षेच्या यशस्वी पार पाडणीसाठी कार्यरत राहतील. जिल्हाधिकारी कार्यालयाने यासंदर्भात बैठक घेऊन सर्व तयारी पूर्ण केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

 
                         
        
        



 
                                         
                                         
                                         
                                        












