५ ते ८ नोव्हेंबरदरम्यान उद्धव ठाकरे साधणार शेतकऱ्यांची संवाद (Photo Credit - X)
Maharashtra Politics: यंदा पावसाळ्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई दिवाळीपूर्वी देण्याचे आश्वासन राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिले होते. हा आनंदमय सण गोड करण्याचे वचनही दिले होते. मात्र, दिवाळी होऊन आठवडा उलटला तरी शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईचे अनुदान जमा झालेले नाही. या पार्श्वभूमीवर, शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे हे ‘दगाबाज रे’ असा मराठवाडा संवाद दौरा करणार आहेत.
ते ५ ते ८ नोव्हेंबर या चार दिवसांत शेतकऱ्यांशी संवाद साधतील, अशी माहिती शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. ते क्रांतीचौक येथील मातृभूमी प्रतिष्ठान येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. निवडणूक आयोगाच्या विरोधात महाविकास आघाडीने दोन दिवसांपूर्वी मुंबईत ‘सत्याचा मोर्चा’ काढला होता. यानंतर शिवसेनेकडून आता ‘दगाबाज रे’ दौरा काढला जाणार आहे.
‘सत्याच्या मोर्चाला’ नागरिकांनी प्रतिसाद दिला, आता या संवाद दौऱ्यातही नागरिक आपली कैफियत मांडतील, असे दानवे म्हणाले. या संवाद दौऱ्यात उद्धव ठाकरे हे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील काही गावांचा दौरा करणार आहेत. ५ ते ८ नोव्हेंबर असा चार दिवसांचा हा दौरा असेल. मराठवाड्यानंतर ते राज्याचा दौरा करतील, अशी माहिती दानवे यांनी दिली.
दानवे म्हणाले, “सरकारची आर्थिक परिस्थिती पाहता सरकार मदत करू शकत नाही, अशी स्थिती आहे. मोजकीच मदत शेतकऱ्यांना मिळाली आहे. ‘एनडीआरएफ’चे निकष बदला असे आम्ही सरकारला सांगितले होते, पण पॅकेज शेतकऱ्यांपर्यंत पोहचले नाही, मात्र सरकार उगाच ढोल बडवत आहे.” त्यामुळे या संवाद दौऱ्यातून शेतकऱ्यांची कैफियत समजून घेण्याचा हा प्रयत्न असेल.
बुधवार, ५ नोव्हेंबर रोजी संभाजीनगर येथून दौऱ्याला प्रारंभ होईल. यानंतर ६, ७, ८ नोव्हेंबर रोजी मराठवाड्यातील इतर ठिकाणी भेट देऊन ते शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतील. ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता संभाजीनगर येथील सुभेदारी विश्रामगृहात ते संभाजीनगर-जालना येथील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील.
अंबादास दानवे म्हणाले की, “शेतकरी दिवाळी साजरी करू शकला नाही. त्यांना मदत पोहचली नाही. खरडून गेलेल्या जमिनीची काहीही मदत आलेली नाही. सरकारने कर्जमुक्तीसाठी ३० जून ही तारीख दिली आहे. मराठवाड्याला काय पॅकेज मिळाले ते पाहण्यासाठी येणार असल्याचे सांगितले होते. शासन शेतकऱ्यांशी दगाबाजी करत आहे. त्यामुळे ‘दगाबाज रे’ अशी मोहीम आम्ही सुरू करत आहोत.” या दौऱ्यात शेतकरी बांधवांनी तसेच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले आहे.






