सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : जम्मू काश्मीरमध्ये दहशदवादी हल्ला करुन अशांतता निर्माण करण्यात आली आहे. पहलगाम भागात भीषण दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात हिंदू पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले. यामध्ये आतापर्यंत 28 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सहा महाराष्ट्रातील पर्यटकांचा समावेश आहे. पुण्यातील २ पर्यटकांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील पडत आहेत. दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे या पर्यटकांच्या घरी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
आतापर्यंत ज्याप्रमाणे आपण खंबीर राहिले त्याचप्रमाणेच यापुढेही खंबीर राहावे, राज्य शासन आपल्या दुःखात सहभागी असून आपल्या पाठीशी आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना धीर दिला. यावेळी गणबोटे यांच्या गंगानगर कोंढवा येथील घरी मुख्यमंत्र्यांसमवेत नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार योगेश टिळेकर, सुनील कांबळे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नी संगीता गणबोटे, मुलगा तुषार, कुणाल, स्नुषा कोमल गणबोटे उपस्थित होते.
जगदाळे यांच्या कर्वेनगर येथील निवासस्थानी मुख्यमंत्र्यांसमवेत राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, सुनील कांबळे, स्व. संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे, मुलगी आशावरी जगदाळे आदी कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. यावेळी गणबोटे यांच्या पत्नी आणि मुलांनी तसेच जगदाळे यांच्या पत्नी आणि मुलगी यांनी घडलेल्या घटनेबाबत सविस्तर माहिती सांगितली.