कर्जत/ जामखेड : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्याची खरीप पूर्व पीक नियोजन आढावा बैठक मंगळवारी कर्जत येथील श्रीराम मंगल कार्यालय येथे पार पडली.
यंदाच्या वर्षी हवामान विभागाने चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे एकूणच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. कर्जत व जामखेड तालुक्यात खरीप हंगामात प्रामुख्याने बाजरी, तुर, मग, उडीद, सोयाबीन व कांदा ही पिके घेतली जातात. त्यामुळे पिकांच्या लागवडीसाठी व संवर्धनासाठी चांगल्या दर्जाचे बियाणे, रासायनिक खते, मुबलक प्रमाणात उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सूक्ष्म नियोजन करणे आवश्यक आहे. त्यासाठीच दोन्ही तालुक्याची मिळून एकत्रित आढावा बैठक खरीप हंगामाच्या पूर्वी घेण्यात आली.
गतवर्षी खरीप हंगामात सुरुवातीच्या काळात चांगला पाऊस झाल्यामुळे उडीद पिकाच्या लागवड क्षेत्रात अडीच पट वाढ झाली होती. कर्जत व जामखेड दोन्ही तालुक्यातील मिळून 66498 हेक्टर क्षेत्रात उडीद पिकाची पेरणी शेतकऱ्यांनी केली होती. यावेळी अचानक मोठ्या प्रमाणात मागणी निर्माण झाल्यामुळे उडीद बियाणांचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. अशा वेळी आमदार रोहित पवार यांनी बियाणे उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन निर्मल सीड्स, वेस्टर्न अॅग्री सीड्स, बूस्टर प्लांट जेनेटिक्स लिमिटेड, महोदया सीड्स कंपनी या कंपन्यांचे 600 क्विंटल अतिरिक्त उडीद बियाणे मागील वर्षी कर्जत जामखेड मतदारसंघातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले होते. सगळीकडे तुटवडा असतानाही आपल्या मतदारसंघात रोहित पवारांनी तुटवडा होऊ दिला नाही.
कांदा पिकाच्या बियाण्यांमध्ये शुद्धतेचा मोठा प्रश्न आहे. मागच्या वर्षी हेच ओळखून आमदार रोहित पवार यांनी कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांच्या मार्फत कांदा बियाणे व बियाणे निर्मितीसाठी लागणारा उत्तम दर्जाचा गोठ कांदा उपलब्ध करून दिला होता. त्यामुळे दोन्ही तालुक्यामध्ये बियाणे टंचाईचा धोका टळला होता. त्याबरोबरच 2021 या वर्षी रेल्वे मालवाहू धक्का काही काळ बंद होता. त्यामुळे युरिया व डीएपी या रासायनिक खतांचा जिल्हाभरात तुटवडा निर्माण झाला होता. यावेळी रोहित पवार यांनी कृषी विभागाचे अधिकारी व रासायनिक खत कंपन्यांची बैठक घेऊन मोठ्या प्रमाणात रासायनिक खते गरजेच्यावेळी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली. मागच्या वर्षी आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून सुयोग्य नियोजन झालं होतं, यावर्षी त्यापेक्षाही अधिक चांगल्या प्रकारे नियोजन व्हावं यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यासाठी खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासातून त्यांची सुटका करण्यासाठी आमदार रोहित पवार हे सतत प्रयत्न करत असतात हे पुन्हा एकदा दिसून येत आहे.
[read_also content=”औरंगाबादेत नमाज सुरू असताना वाजवले भोंग्यावर गाणे, रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा! https://www.navarashtra.com/maharashtra/a-song-was-played-on-a-horn-while-prayers-were-being-offered-in-aurangabad-nrdm-273213.html”]
शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार वेगाने व्हावा या अनुषंगाने कर्जत जामखेड तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले होते. तसेच शेतकऱ्यांनीही या बैठकीला मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली. या कार्यक्रमाला कृषी विभागाचे रवींद्र माने, शंकरराव किरवे, अनिल गवळी, पद्मनाभ म्हस्के, रुपचंद जगताप, राजेंद्र सुपेकर यांच्यासह विवेक भोईटे, देविदास घोडेचोर विक्रम गदादे व नगरसेवक, स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे देखील उपस्थित होते.