दररोज होते ३६ हजार लिटर दुधाचे उत्पादन! सात टक्क्याने आवक घटली; खाजगी दूध विक्रेत्यांची संख्या मोठी
यवतमाळ जिल्ह्याला दररोज ८१ हजार लिटर दुधाची गरज आहे. मात्र दिवसाला ३६ हजार ४७२ लिटर दुधाचेच उत्पादन होत आहे. प्रत्यक्षात आवक मात्र सात टक्क्याने आवक घटली असून ही आकडेवारी सरकारी असून, खासगीत दूध विक्रेत्यांची मोठी संख्या आहे. विक्रेते दुधाची घरोघरी विक्री करतात. परंतु याबाबतच्या नोंदीच प्रशासनाकडे नाहीत, तसेच परराज्यातून किंवा अन्य जिल्ह्यांतून दुधाचा पुरवठा जिल्ह्यात होतो.(फोटो सौजन्य – AI)
विविध नावाने पाकीटबंद दुधाची विक्री केली जात आहे. त्यामुळे पाकीटबंद दुधातील गुणवत्ता कशी, याबाबत ग्राहकांना नेहमीच प्रश्न पडतो. त्यामुळे एफडीएकडून तपासणीची गती अधिक वेगाने व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. येथील अन्न व औषध प्रशासन आयुक्त कार्यालयाने ज्यूस, आइस्क्रीम, दूध, पनीर, तूप आदींचे नमुने घेतले. याशिवाय मिल्क केक, हॉटेलातील विविध पदार्थांची तपासणी केली. घाटंजी येथे घेतलेल्या दह्याचे दोन्ही नमुने अप्रमाणित निघाले. दह्यात कमीत कमी ४.५ फॅट असेल तर, शरीरासाठी त्याचा फायदा होतो. घाटंजीत घेतलेल्या दह्याच्या नमुन्यात २.४६ इतकेच फॅट निघाले. अकोला बाजार येथे एका स्वीट मार्टमधून नमुने घेतले. त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही.
एफडीएचे आयुक्त म्हणून आयएएस तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच भेसळखोरांविरोधात कारवाईचा धडाका लावला. राज्यात सर्वच ठिकाणी दररोज तपासणी, धाडसत्र मोहीम राबविली जात आहे. त्यामुळे भेसळखोरांचे धाबे दणाणून गेले आहे. एफडीएने दुधाच्या गुणवत्तेवरही लक्ष केंद्रित केले आहे. जिल्ह्यातही मोहीम राबविली जात असून, ग्राहकांना पौष्टिक व गुणवत्तापूर्ण दुधाची विक्री करावी, अशी ताकीद व्यावसायिकांना देण्यात आली आहे.
दरवर्षी पावसाळ्यात दूध उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे काही प्रमाणात दुधाची टंचाई जाणवते. सध्या एफडीएकडून धाडसत्र सुरू असल्याने भेसळखोरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. परिणामी दूध उत्पादनात पाच ते सात टक्क्यांची घट झाली आहे. शेतक-यांना शेतीसोबतच जोडव्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करता यावा यासाठी शासनाने अनेक योजना आणल्या. मात्र अजूनही शेतकऱ्यांना जोडव्यवसायासाठी अपेक्षित बळ मिळाले नाही. शेतीतही नुकसान होत असल्याने शेतकरी संकटात आहे.
गुप्त माहिती आणि तक्रारीच्या आधारे जिल्हाभरात विविध ठिकाणी धाड टाकून कारवाई करण्यात आली. मे आणि जून अशा दोन महिन्यांत ६० नमुने घेण्यात आले. त्यातील पाच अप्रमाणित अर्थात नागरिकांच्या आरोग्यासाठी असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले. दूध आणि दुग्धजन्य पदार्थाचे सात नमुने दोन महिन्यात घेण्यात आले आहेत. अशी प्रशासकिय माहिती आहे.






