उल्हासनगर : उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यामध्येच (Ulhasnagar Hillline Police Station) भाजपा आमदार गणपत गायकवाड (BJP MLA Ganpat Gaikwad) यांनी शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर गोळीबार केला. यामुळे शिंदे गट (Shinde Group) व भाजपमध्ये (BJP) सर्व काही आलबेल नसल्याचे समोर आले आहे. पोलिस ठाण्यातच हा गोळीबार झाल्यामुळे परिसरामध्ये खळबळ निर्माण झाली आहे. याबाबत आता गणपत गायकवाड यांनी धक्कादायक दावा केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमुळे (CM Eknath Shinde) हा गोळीबार केल्याचा खुलासा आमदार गायकवाड यांनी केला आहे.
भाजप आमदाराने केलेल्या या गोळीबारामध्ये शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड आणि राहुल पाटील असे दोघे जखमी झाले आहेत. पोलिसांनी गणपत गायकवाडसह तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर गणपत गायकवाड यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गणपत गायकवाड म्हणाले, “पोलीस स्टेशनच्या दरवाजात माझ्या मुलाला धक्काबुक्की केली. माझ्या जागेचा या लोकांनी (महेश गायकवाड) ताबा घेतला आहे. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्रात फक्त गुन्हेगारच जन्माला येतील. आमच्यासारख्या चांगल्या माणसाला एकनाथ शिंदेंनी आज गुन्हेगार बनवलं आहे. मला मनस्ताप झाला म्हणून मी गोळीबार केला. मी पाच गोळ्या झाडल्या, मला त्याचा काहीही पश्चाताप नाही. माझ्या मुलांना जर मारत असतील पोलीस ठाण्यात तर मग मी काय करणार? पोलिसांनी मला पकडलं म्हणून तो (महेश गायकवाड) वाचला. पोलिसांनी हस्तक्षेप केला, मी त्याला जीवे मारणार नव्हतो. पण मी आत्मसंरक्षणासाठी हे पाऊल उचललं. एकनाथ शिंदेंनी असेच गुन्हेगार महाराष्ट्रात पाळले आहेत. एकनाथ शिंदेंचं दुसऱ्यांचं आयुष्य खराब करायला घेतलं आहे.” असे आमदार गणपत गायकवाड यांनी एका वाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये सांगितले.
श्रीकांत शिंदे दादागिरी करतात
गणपत गायकवाड पुढे म्हणाले, “मी वरिष्ठांना अनेकदा तक्रार केली होती. माझा निधी वापरुन काम झालं की श्रीकांत शिंदे हे स्वतः ते काम केल्याचे बोर्ड लावतात. दादागिरी करुन हे होतं आहे. मी राज्य शासनाचा निधी आणला आणि कामं केली तिथे श्रीकांत शिंदेंनी त्यांची कामं म्हणून बोर्ड लावले. माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. एकनाथ शिंदे यांनी त्या भ्रष्टाचारात किती पैसे खाल्ले ते सांगावं. मी दहा वर्षांपूर्वी जागा घेतली होती. त्यांना पैसेही दिले होते. पण ते सही करायला येत नव्हते. त्यामुळे आम्ही कोर्टात गेलो. कोर्टात केस जिंकलो. केस जिंकल्यावर सातबारा आमच्या नावे झाला. मात्र महेश गायकवाड यांनी त्या जागेवर जबरदस्ती कब्जा केला. मी त्यांना विनंती केली होती की तुम्ही कोर्टात जा, जबरदस्ती कब्जा घेऊ नका. मात्र त्यांनी दादागिरी काही थांबवली नाही. पोलीस स्टेशनच्या आवारात तो 500 लोक घेऊन आला होता. माझ्या मुलाला धक्काबुक्की झाली. त्यामुळे गोळीबार केला. मी एक व्यावसायिक आहे, माझ्या मुलांना कुणी गुन्हेगार मारत असतील तर मी काय करणार? माझ्या मुलाला कुणी मारलं तर मी सहन करणार नाही.” अशी प्रतिक्रिया गणपत गायकवाड यांनी दिली.
एकनाथ शिंदे भाजप सोबत पण गद्दारी करणार
“एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली आणि भाजपाबरोबरही ते गद्दारी करणार आहेत. माझ्याबरोबरही गद्दारीच केली. एकनाथ शिंदेंकडे माझे कोट्यवधी रुपये आहेत. एकनाथ शिंदे हे देवाला मानत असतील तर त्यांनी सांगावं किती पैसे खाल्ले आहेत, किती बाकी आहेत. महाराष्ट्रात अशी गुन्हेगारी बंद करायची असेल तर एकनाथ शिंदेंचा राजीनामा घेतला पाहिजे, हे माझं वैयक्तिक मत आहे. एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढवली आहे आणि महाराष्ट्राची वाट लावली आहे. महाराष्ट्र चांगला ठेवायचा असेल तर एकनाथ शिंदेंचा राजीनामा घेतला पाहिजे. अशी माझी विनंती देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही आहे.” असे देखील गणपत गायकवाड म्हणाले आहेत.