नाशिक : शेतकऱ्यांना बचत गट व विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांमार्फत एकाचवेळी खते, बियाणे व कीटकनाशके बांधावर उपलब्ध होण्यासाठी शेतकऱ्यांनी गावातील शेतकरी बचत गट व विविध कार्यकारी सहकारी संस्थांमध्ये खतांची मागणी करण्यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले.
कृषी विभाग आणि ‘आरसीएफ’ कंपनीच्या वतीने राज्यात शेतकरी बांधवांना एकत्रपणे बांधावर खतेवाटपाचा प्रारंभ भुसे यांच्या हस्ते मालेगाव येथे पार पडला. त्या वेळी तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, भास्कर जाधव, पंचायत समिती कृषी अधिकारी संदीप पवार, मंडळ कृषी अधिकारी भाऊसाहेब आढाव, संदीप गलांडे, राहुल जाधव, दीपक मालपुरे, भगवान मालपुरे, आरसीएफ कंपनीचे विपणन अधिकारी बजरंग कापसे, विशाल सोनवलकर, शेतीनिष्ठ शेतकरी विनोद जाधव, मनोहर बच्छाव यांच्यासह इतर पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
दादा भुसे नेमकं काय म्हणाले?
सध्या शेतीविषयक परिस्थिती कठीण असली तरी शेतकरी अतिशय परिश्रमपूर्वक काम करत आहे. शेतकऱ्यांनी जर एकत्रितपणे खते, बियाणे व कीटकनाशके यांची खरेदी केली तर त्यांना शेताच्या बांधावर ते एकाचवेळी उपलब्ध झाल्याने त्याचा फायदा होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी बचत गट व विविध कार्यकारी सहकारी संस्थाकडे मागणी नोंदविणे आवश्यक आहे. असे केल्यास कृषी विभागांतर्गत खतांचा पुरवठा करणाऱ्या कंपनीकडून पुरेशा प्रमाणावर साठा उपलब्ध करून देता येणार आहे. या अनुषंगानेच कृषी विभागाने खते, बियाणे व कीटकनाशके उपलब्ध करून द्यावीत, अशा सूचनाही भुसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
[read_also content=”मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले : वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/maharashtra/health-minister-rajesh-topes-big-statement-about-monkey-pox-disease-what-exactly-did-he-say-read-more-nrdm-284916.html”]
दरम्यान खते वापरताना शेताच्या मातीचा नमुना तपासून जमीन आरोग्य पत्रिका तयार करावी. ही पत्रिका तयार केल्यानंतर आवश्यकतेनुसार खतांचा वापर करावा. त्याचप्रमाणे जैविक खतांचा वापर केल्यास त्याचा फायदा होऊन कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना मदत होणार आहे. तसेच इतर सेंद्रिय खते, जैविक खतांचा वापर केल्याने रासायनिक खतांच्या तुलनेत दहा टक्के बचतही होणार आहे. यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना सर्व खतांचे महत्त्व पटवून द्यावे, असेही भुसे यांनी या वेळी सांगितले.